– प्रेमानंद बच्छाव
मुंबई : “राज्यातील एसटी महामंडळाची सर्व बसस्थानके आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात यावे. तसेच बसस्थानक, आगारांमध्ये उभ्या असलेल्या नादुरुस्त, भंगार बसेस आणि परिवहन कार्यालयाकडून जप्त केलेल्या वाहनांचे येत्या 15 एप्रिलपर्यंत निष्कासन करावे,” असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (27 फेब्रुवारी) दिले. राज्यभरात सर्वच एसटी बसस्थानके आणि आगारांमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात यावी, अशा सूचनाही सरनाईक यांनी दिल्या. (ST Bus transport minister pratap sarnaik orders after pune rape case)
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी गुरुवारी तातडीने एसटी महामंडळाचे बसस्थानके तसेच आगरांच्या सुरक्षेबाबत बैठक घेतली. या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेताना परिवहन आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पद असून या रिक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे. बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांची गस्त बसस्थानकावर वाढवण्यात यावी. आगार व्यवस्थापक हे त्या आगाराचे पालक असल्यामुळे त्यांनी तेथील निवासस्थानामध्येच वास्तव्य करावे. याबरोबरच बसस्थानकावर काम करणाऱ्या प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला त्याचे ओळखपत्र देण्यात यावे. जेणेकरून कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशांना कोणी लुबाडणार नाही, असेही मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
बसस्थानक अथवा आगारात आलेल्या प्रत्येक बसची नोंदणी सुरक्षा रक्षकाकडे होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चालक – वाहकांनी आगारात आणलेली बस सोडताना बसचे दरवाजे, खिडक्या बंद असल्याची खात्री करावी. बस स्थानकांवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परीसरात फिरणाऱ्या अनोळखी इसमांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी केल्या. बसस्थानकांवर स्वच्छतेबाबत कुठलीही तडजोड नसावी. प्रत्येक बसस्थानकावर महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. ही स्वच्छतागृह प्रशस्त असावीत. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा वेळोवेळी आढावा घेत राहणे आवश्यक आहे, असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले.