मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 व्या वर्धापन दिन सोहळ्यात भाषण करताना महाकुंभमेळा आणि गंगा नदीतील पाण्याबाबत थेट विधान केले. त्यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर माणसं-बाया अंग घासून अंघोळ करत आहेत आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, असे विधान राज ठाकरेंनी केले. त्यांच्या या विधानावर आणि एकंदरितच त्यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कौतुक केले आहे. तर अधूनमधून राज ठाकरे खरं बोलतात, असा मिश्किल टोलाही अंधारे यांनी लगावला आहे. (Sushma Andhare praises Raj Thackeray statement regarding Mahakumbh Mela and water in Ganga river)
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. तर या पोस्टच्या माध्यमातून अंधारे यांनी मोदी समर्थकांना सल्ला सुद्धा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अधूनमधून राज ठाकरे खरं बोलतात. कुंभमेळ्याच्या संदर्भाने देशातील नद्यांचे पाणी आणि स्वच्छता प्रकल्पाबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका दुर्दैवाने खरी आहे. ती प्रबोधनकारांच्या डोळस हिंदुत्वाशी सुसंगत आहे. तेव्हा त्याचा विपर्यास करण्यापेक्षा मोदी भक्तांनी आत्मचिंतन करावे. @RajThackeray” असे स्पष्टपणे अंधारेंनी म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका किती जणांना पटली आणि किती जणांना नाही पटली, हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच कळेलच.
हेही वाचा… Raj Thackeray : हड् मी ते पाणी पिणार नाही…; गंगेतील पाण्याबाबत राज ठाकरे काय बोलून गेले?
काय म्हणाले राज ठाकरे?
मनसेच्या 19 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, चिंचवडमधील मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्याबाबत म्हणाले की, मध्यंतरी मुंबईत आमच्या पदाधिकाऱ्यांची मेळावा बैठक लावली होती. त्यात काही शाखेचे पदाधिकारी गैरहजर होते आणि जे गैरहजर होते त्यांची हजेरी मी घेतली. त्यावेळी प्रत्येकाला विचारले असता त्यातल्या अनेकांनी आपली आपली कारणे दिली. त्यातल्या बहुतांश लोकांनी कुंभमेळ्याचे कारण पुढे केले. त्यामुळे मुळात तुम्ही पाप करताच कशाला? असा प्रश्न मी त्यांना केला. शिवाय परत आल्यावर अंघोळ केली का असेही विचारले. बाळा नांदगावकर ही कमंडलुमधून पाणी घेऊन आले. मी त्यांना म्हटले हड मी ते पिणार नाहीये. सोशल मीडियावर माणसं-बाया अंग घासून अंघोळ करत आहेत आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, असे विधान राज ठाकरेंनी केले.
अधूनमधून राज ठाकरे खरं बोलतात. कुंभमेळ्याच्या संदर्भाने देशातील नद्यांचे पाणी आणि स्वच्छता प्रकल्पाबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका दुर्दैवाने खरी आहे. ती प्रबोधनकारांच्या डोळस हिंदुत्वाशी सुसंगत आहे. तेव्हा त्याचा विपर्यास करण्यापेक्षा मोदी भक्तांनी आत्मचिंतन करावे. @RajThackeray
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 9, 2025