Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईThane : ठाणे पालिकेकडून मराठीची गळचेपी? त्या आदेशाने संताप

Thane : ठाणे पालिकेकडून मराठीची गळचेपी? त्या आदेशाने संताप

Subscribe

ठाणे : महाराष्ट्रात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो. अशामध्ये ठाण्यामधून मराठीचीच गळचेपी होत असल्याची एक बातमी समोर आली आहे. कारण, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मराठी भाषेचा शासकीय कार्यालयात वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे ठाणे महानगर पालिकेमध्ये यापुढे मराठी भाषेतून एमए (कला शाखेतील पदवीधर) शिक्षण घेणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे ठाणेकरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Thane Municiple Corporation employees pursuing ma in marathi will not get additional salary hike)

हेही वाचा : Swargate Rape Case : शक्ती कायद्याची अंमलबजावणी सरकार कधी करणार? वडेट्टीवारांचा सवाल 

काही दिवसांपूर्वीच ठाणे पालिकेने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अभियान राबवले. पण, नुकतेच ठाणे पालिकेने काढलेल्या या परिपत्रकामुळे मराठी भाषेचे वावडे का? असा सवाल ठाणेकरांकडून विचारला जात आहे. दरम्यान, परिपत्रकात असे सांगितले आहे की, सातव्या वेतन आयोगामध्ये शिक्षणावर आधारीत अतिरिक्त वेतनवाढी देय असण्याबाबत शासन निर्देश अद्याप प्राप्त झालेले नाही. यामुळे डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए (मराठी) आणि तत्सम अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त वेतनवाढीबद्दल प्रशासनाने अंतिम निर्णय देणे आवश्यक असल्याचे निरिक्षण मुख्य लेखापरिक्षक यांनी नोंदविले होते. या निरिक्षणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आल्याने आता यापुढे अशा प्रकारचे शिक्षण घेणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे जे अशा पध्दतीने शिक्षण घेणार असतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे परिपत्रकार नमुद करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवरील जे अधिकारी आणि कर्मचारी महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए (मराठी) आणि तत्सम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करतात, त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती. विद्यमान खासदार नरेश म्हस्के हे ठाणे महापालिकेमध्ये सभागृह नेते होते, त्यावेळेस तशा आशयाचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. पण, हा ठराव रद्द करायचा असल्यास त्यासाठी पुन्हा महासभेपुढे जाणे अपेक्षित आहे. असे असताना महापालिकेने परिपत्रक काढून यापुढे जे अशा प्रकारचे शिक्षण घेणार असतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

मनसे आक्रमक

राज्यात मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना अशाप्रकारे परिपत्रक काढून ठाणे पालिकेने मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. गुरुवारी (27 फेब्रुवारी) ठाणे पालिकेमध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यात मराठीतून शिक्षण घेतले म्हणून वेतनवाढ होणार नसेल तर यापुढे असे शिक्षण कोण घेईल? ज्याची पुढे शिकायची असेल तर तो एमए कसा होईल? असा प्रश्न उपस्थित करत गुरुवारी संध्याकाळपर्यंत हा जीआर रद्द करण्याची मागणी केली.