HomeमहामुंबईठाणेBadalapur : प्रजासत्ताक दिनापूर्वी दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करा अन्यथा आंदोलन

Badalapur : प्रजासत्ताक दिनापूर्वी दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करा अन्यथा आंदोलन

Subscribe

रेल्वे प्रवासी महासंघाचा इशारा

बदलापूर । मागील काही दिवसांपासून दादर रत्नागिरी पॅसेंजर ही अत्यंत उपयुक्त सेवा बंद आहे. त्यामुळे अल्प आर्थिक उत्पन्न असणारे सर्व सामान्य कोकणी रेल्वे प्रवासी प्रचंड नाराजी आहे. प्रजासत्ताक दिनाआधी ही सेवा सुरू करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रवास महासंघाच्या वतीने देण्यात आला. ही पॅसेंजर सुरू झालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी करणारी अनेक पत्रे आमच्या प्रवासी महासंघाकडे आलेली आहेत. प्रवाशांच्या या संतप्त भावना विविध राजकिय पक्षांकडे व्यक्त होत आहेत. याचा कदाचित एखाद्या जनआंदोलनातून उद्रेक होण्याची शक्यता दिसते. मेल एक्स्प्रेसच्या जनरल बोगीजची संख्या कमी केल्यामुळे व अनेक गाड्यांना सुपर फास्ट केल्यामुळे सर्वसाधारण रेल्वे प्रवासी आधीच रेल्वे प्रशासनावर नाराज आहेत. त्यामध्ये दादर रत्नागिरी ही सर्वाधिक उपयुक्त पॅसेंजर बंद करण्यात आल्यामुळे ते निश्चितच संतप्त झाले आहेत.

या देशातील संपत्ती आणि संसाधने यावर प्रथम अधिकार देशातील सामान्य जनतेचाच असेल अशी त्रिवार ग्वाही केंद्र सरकार आणि देशाचे पंतप्रधान जाहीर रित्या सातत्याने देत आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाचा पॅसेंजर बंद करण्याचा निर्णय हा केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री यांचा अपमान करणारा आहे. असे आमचे स्पष्ट मत असल्याचे महासंघाने सांगितले.  रायगड, रत्नागिरी हे जिल्हे दुर्गम आणि अविकसित आहेत. मुंबई ठाणे परिसरात अल्प पगार असणार्‍या नोकरदार जनतेसाठी दादर रत्नागिरी पॅसेंजर या गाडीला अधिक थांबे असल्यामुळे अत्यंत सुविधाजनक आणि आर्थिक दृष्ठ्या गरिबांच्या प्रवासासाठी अत्यंत गरजेची आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता दादर-रत्नागिरी पॅसेंजरगाडी येत्या २६ जानेवारी अर्थात भारतीय गणतंत्र दिनाच्या पूर्वीच सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्यथा उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असा इशारा ही संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार, अध्यक्ष लता आरगडे, सरचिटणीस जितेंद्र विशे, उपाध्यक्ष संजय मेस्त्री यांनी दिला.