भिवंडी । भिवंडीतील मुंबई- नाशिक महामार्गावर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. या महामार्गावर पडघा टोल नाक्यावरून टोल वसूल केला जातो, परंतु रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी केला आहे. या महामार्गावरील पडघा टोल नाक्यावरील टोल वसुलीवर नजर ठेवण्यासाठी खासदार बाळ्या मामा यांनी आपले कार्यकर्ते शुक्रवार,शनिवार आणि रविवार असे तीन दिवस टोल नाक्यावर बसवून ठेवले होते. या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तीन दिवस आणि रात्र टोल नाक्यावरून येणार्या जणार्या गाड्यांची नोंद घेण्याचे काम सुरु केले आहे.
शनिवारी सायंकाळी खासदार बाळ्या मामा यांनी पडघा टोल नाक्यावर कार्यकर्त्यांकडून वाहनांच्या नोंदीची माहिती घेतली.
मुंबई नाशिक महामार्गचे काम अनेक ठिकाणी संथ गतीने सुरू आहे. नागरिकांना आणि वाहन चालकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पुरविण्यात टोल प्रशासन हलगर्जी करत आहे. प्रवाशांना कोणत्याही सुविधा टोल प्रशासनाकडून पुरविण्यात येत नाहीत. ज्या ज्या वेळेस प्रवाशांच्या सोयी सुविधांचा मुद्दा पुढे केला जातो, त्या त्या वेळेस टोल प्रशासनाकडून टोल वसुली होत नसल्याची बाब पुढे करण्यात येत असते. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून या टोल नाक्यावर आपण स्वतः कार्यकर्ते दिवस रात्र बसवले असून शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसात टोल नाक्यावरून ये-जा करणार्या वाहनांची नोंद घेण्यात येत आहे. लवकरच या टोल कंपनीच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड आपण करणार असून टोल कंपनी बरोबरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकार्यांविरोधात कारवाई व्हावी यासाठी देखील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.