भिवंडी । भिवंडी महानगरपालिकेच्या नोंदणीनुसार शहरात १४१ खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी ४ रुग्णालये बंद आहेत. राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे संचालक यांनी राज्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तातडीने तपासणी करुन रुग्णालय प्रशासनाकडून महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम १९४९ मधील तरतुदीचे पालन होते कि नाही, याची शहानिशा करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका खासगी रुग्णालयावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आल्याने शहरातील खाजगी वैद्यकीय सेवा देणार्या डॉक्टरांमध्ये आणि रुग्णालय व्यवस्थापनामध्ये खळबळ माजली होती. भिवंडी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागास राज्यातील आरोग्य विभागाच्या संचालकांकडून नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची तातडीने तपासणी करुन रुग्णालय प्रशासनाकडून महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम १९४९ मधील तरतुदीचे पालन होते किंवा नाही ? या बाबतची तपासणी करण्याबाबत कळविण्यात आले.
त्यानुसार शहरातील खासगी रुग्णालयास भेटी देऊन रुग्णालयामध्ये वैद्यकिय सेवा संबंधीत माहिती दर्शनी भागात लावण्याच्या सूचना आल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संदीप गाडेकर यांनी दिली. दरम्यान काही दिवसांपूर्वी भिवंडीतील दक्ष नागरिक नागेश किसनराव निमकर यांना मेहेर हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना वाईट अनुभव आला. त्यामुळे त्यांनी भिवंडीतील समस्त खाजगी रुग्णालयाविरोधात राज्यपालांकडे लेखी तक्रार केली. त्याची दाखल घेत महानगरपालिकेने मेहेर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास हॉस्पिटलची नोंदणी रद्द करण्यात येत असून आपल्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण औषधोपचार घेत आहेत.त्यांना इतर हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात यावे व पुढील आदेश होईपर्यंत आपले हॉस्पिटलचे कामकाज तात्काळ बंद करण्यात यावे,अशी नोटीस त्यावेळी बजावली होती. त्यानंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने कायदेशीर पूर्तता करून रुग्णालय सुरु ठेवले. या घटनेची शहरातील खाजगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने धास्ती घेतली आहे.भिवंडी शहरात महानगरपालिकेची १९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. १० स्व.बाळासाहेब ठाकरे दवाखाने तर ८ आरोग्य वर्धिनी केंद्र असताना, तसेच शहरातील इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय असताना भिवंडीतील खाजगी रुग्णालयाची होणारी वाढ चिंताजनक असल्याचे मानले जात आहे.
शहरात महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन(सुधारित) नियम २०२१ नुसार शासनाच्या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम शहरात सुरु केले आहे. भिवंडीतील खासगी रुग्णालयात त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.तसेच रुग्णालयांची तपासणी देखील सुरू आहे.
– डॉ. संदीप ऊ.गाडेकर, भिवंडी महापालिका, वैद्यकीय आरोग्य अधिकारी