भिवंडी । गेल्या काही वर्षांपासून अभय योजनांच्या भरवशावर थकबाकी वसूल करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना या वर्षीचे कर वसुलीचे निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या. भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक अनमोल सागर यांनी मालमत्ता कर वसुलीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. त्यामध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षातील कर वसुलीच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत उपायुक्त (कर) बाळकृष्ण क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मालमत्ता कर आणि पाणी कराची एकूण मागणी ८११.१९ कोटी रुपये आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त ६४.१० कोटी रुपये वसूल झाले आहेत.तसेच १ फेब्रुवारी २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान अभय योजने अंतर्गत झालेल्या २१.० कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
एकूण थकबाकीच्या तुलनेत कर वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याबद्दल या बैठकीत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच वसुली जलद करण्याच्या सूचना देताना त्यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, पाण्याचे कनेक्शन तोडणे आणि स्थावर जंगम मालमत्तेवर कायदेशीर कारवाई करणे यासारख्या कठोर उपाययोजना अवलंबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयुक्तांनी अधिकार्यांना येत्या काळात कर वसुलीला प्राधान्य देण्याचे आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (कर) देविदास पवार, उपायुक्त (कर) बाळकृष्ण क्षीरसागर आणि विभाग समित्या क्रमांक १ ते ५ चे सर्व वसुली अधिकारी उपस्थित होते.