HomeमहामुंबईठाणेBhiwandi : Wada: भिवंडी-वाडा मार्गाला दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेची थेट जोडणी द्या 

Bhiwandi : Wada: भिवंडी-वाडा मार्गाला दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेची थेट जोडणी द्या 

Subscribe

खासदारांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

कल्याण । भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या भिवंडी-वाडा मार्गाशी थेट जोडणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सविस्तर चर्चा केली. भिवंडी-वाडा हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 848 असून, औद्योगिक, व्यापारी आणि शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे अगदी जवळून जाऊनही यावर थेट प्रवेश उपलब्ध नाही, यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भिवंडी-वाडा मार्गाच्या केवळ 8 किमी अंतरावरून दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे जात असतानाही थेट कनेक्टिव्हिटी नाही.
परिणामी, वाहतूक वळसा घालून तब्बल 18 किमीचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.यामुळे वेळ इंधन आणि आर्थिक नुकसान होत आहे. भिवंडी शहरातील वाहतूक आधीच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यायी मार्गांचा अतिरेक झाल्याने वाहतूक कोंडी तीव्र झाली आहे. नागपूर, पुणे आणि पनवेलसारख्या महत्त्वाच्या मार्गांसाठी प्रवास अधिक वेळखाऊ आणि खर्चिक बनला आहे. कुडूस एमआयडीसीतील अनेक कंपन्या स्थलांतर करत आहेत. स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. शेतकर्‍यांना आपला माल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि खर्च सहन करावा लागत आहे.
भिवंडी-वाडा मार्गावर लामज गावाजवळून दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर थेट प्रवेशद्वार निर्माण करावे.रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व दुरुस्ती करून अत्याधुनिक वाहतूक सुविधा निर्माण करावी. नवीन इंटरचेंज तयार करून भिवंडी-वाडा मार्ग थेट एक्स्प्रेसवेने जोडावा, यामुळे वाहतूक वेगवान होईल आणि स्थानिकांसाठी सहज उपलब्धता निर्माण होईल, असे खासदार म्हात्रे यांनी सुचवले आहे.

भिवंडी-वाडा औद्योगिक पट्टा वेगाने विकसित होईल, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. 5,000 हून अधिक नवीन रोजगार संधी निर्माण होऊन स्थानिक तरुण आणि कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळेल. शेतकरी आपला माल वेगाने आणि किफायतशीर दरात बाजारपेठांमध्ये पाठवू शकतील. भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळेल, रहिवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा व सुलभ होईल. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडी-वाडा परिसराचा विकास झपाट्याने होईल, असे म्हात्रे यांनी नोंद केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत या विषयावर सकारात्मक आणि आशादायी चर्चा झाली आहे. लवकरच आवश्यक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला.