भिवंडी । भिवंडी महानगरपालिकेच्या क्षेत्रात महानगरपालिकेचे एकूण पाच प्रभाग असून या सर्व प्रभागात काही ठिकाणी नियमित कर भरणार्या मालमत्ता धारकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. मात्र अनेक अनधिकृत इमारतीमध्ये नियमित व वेळेवर पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील करदात्या नागरिकांमध्ये असंतोष आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात उघडकीस आलेले १८९२ अनधिकृत इमारतींचे बांधकाम झाले आहे. या इमारतींपैकी अनेक इमारतीमध्ये कुटुंबे राहत असून त्या इमारतीमधील कुटुंबांना नियमित पालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. अशा अनेक इमारतीमधील कुटुंबाकडून मालमता कर तसेच पाणीपुरवठा कर भरला जात नाही. तर काही अनधिकृत इमारतींना शास्ती न आकारता केवळ महानगरपालिका सेवा देते म्हणून त्यांच्याकडून कर मूल्यांकन विभागातून कर आकारणी केली जात आहे. मात्र अशा अनधिकृत इमारतीच्या आकारणीच्या कर पावतीवर अनधिकृत बांधकामाची नोंद पालिकेच्या अधिकार्यांकडून केली जात नाही.
याबाबत अनेक दक्ष नागरिकांनी पालिकेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. इमारत अनधिकृत शिक्का मालमता कर आकारणी पावतीवर नसल्याने इमारत मालक व विकासक सदनिका अथवा दुकान घेणार्या ग्राहकाची फसवणूक करीत आहे. अशा अनधिकृत बांधकामाच्या इमारतीमधील सदनिका नागरिकांना विकल्यानंतर त्यांना पालिकेच्या तत्कालीन अधिकार्यांनी पाणीपुरवठा केल्याचे नुकत्याच पाणी चोरीच्या झालेल्या दोन-तीन कारवाईतून दिसून आलेले आहे. सध्या शहरात शेकडोच्या संख्येने अनधिकृत इमारतीमध्ये अनधिकृत पाणीपुरवठा केला जात असून त्यांच्यावर प्रभाग अधिकारी कारवाई न करता त्यांना सरंक्षण देत आहेत. शहरात पूर्वीच अनधिकृत बांधकामे असताना देखील नव्याने अनधिकृत इमारतींचे बांधकाम थांबलेले नाही. तर अशा अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा करण्याचे काम देखील थांबलेले नाही. याचा परिणाम शहरातील नियमित कर भरणार्या करदात्यांच्या पाणीपुरवठ्यांवर होऊ लागला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन ढासळले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. करदात्यांना वेळेवर नियमित व पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात एकूण १८९२ अनधिकृत इमारतीची नोंद झालेली आहे.त्यापैकी काही इमारतींची प्रकरणे न्यायालयात आहेत.तर इतर अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरु आहेत.
-अरविंद घोगरे, भिवंडी महानगरपालिका शहर विकास अधिकारी
भिवंडी महानगरपालिकेच्या क्षेत्रातील महानगरपालिकेच्या जलवाहिनीमधून थेट पाणीचोरी करणार्या पाणीचोरांवर मनपाच्या भरारी पथकाद्वारा कारवाई केली जाते. मात्र शहरातील अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीमधील पाणी चोरांवर प्रभाग अधिकार्यांनी कारवाई केली पाहिजे.
– संदीप पटनावर, कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिका, पाणीपुरवठा विभाग