डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये अमराठी लोकांकडून अर्थात परप्रांतीयांची दादागिरी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कुठे मराठी माणसाला मारहाण तर कुठे मराठी माणसाला घर नाकारण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण या घटना इतक्यावरच थांबल्या नसून डोंबिवलीतील एका सोसायटीत तर मराठी लोकांना सत्यनारायणची पूजा आणि हळदीकुंकूचा कार्यक्रम करण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवलीतील नांदिवली परिसरात असलेल्या सोसायटीत सोमवारी (ता. 27 जानेवारी) हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयारल झाला आहे. (Dombivali Crime Marathi vs Amarathi dispute in Nandivali Society)
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया नावाची इमारत असून याठिकाणी येत्या 2 फेब्रुवारीला सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. परंतु, काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचे फोटो काढून सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपशब्द वापरले. त्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला. याबाबत मराठी महिलांनी सांगितले की, आमच्या गृहसंकुलात सत्यनारायण पूजा किंवा हळदीकुंकु कार्यक्रम करण्यासाठी आम्ही सोसायटी सदस्यांकडून किंवा सोसायटी चालकांकडून वर्गणी मागितली नव्हती. आम्ही स्वखर्चाने हा कार्यक्रम करत आहोत. या कार्यक्रमाची माहिती सोसायटीच्या फलकावर प्रसिध्द करण्यात आली. या कार्यक्रमाची चर्चा सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुरू करण्यात आली. ही चर्चा सुरू असताना अमराठी भाषकांनी हा कार्यक्रम सोसायटीत होऊ द्यायचा नाही.
तसेच, आम्ही महिला हा कार्यक्रम स्वखर्चाने करत आहोत. यामध्ये सोसायटीचा पैसा नाही. अशी भूमिका घेऊन हा कार्यक्रम करायचाच यासाठी आम्ही महिला सोसायटी आवारात जमलो. तेव्हा अमराठी व्यक्तीने आम्हाला शिवीगाळ केला. त्यावेळी त्या व्यक्तीने मराठी लोकांसाठी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. तसेच, हा कार्यक्रम करण्यासही त्या व्यक्तीकडून तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे अमराठी भाषिक आमच्या कार्यक्रमाला विरोध करतात म्हणून आम्ही मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलो, असे महिलांकडून सांगण्यात आले. तर, अमराठी कुटुंबीयांचे असे प्रकार पुन्हा खपवून घेणार नाही, असा इशारा सोसायटीतील मराठी सदस्यांनी दिला आहे.