HomeमहामुंबईठाणेDombiwali : मालमत्ता कर, पाणीपट्टीसाठी केडीएमसीची अभय योजना

Dombiwali : मालमत्ता कर, पाणीपट्टीसाठी केडीएमसीची अभय योजना

Subscribe

दंड-व्याजात शंभर टक्के सूट

डोंबिवली । कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवरील थकबाकीदारांसाठी २०२४-२५ सालासाठी विशेष अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेत १५ जानेवारी २०२५ पर्यंत थकबाकी भरणार्‍या नागरिकांना शास्ती (दंड व्याज) १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. तसेच १६ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत ७५ शास्ती माफीचा लाभ घेता येईल. महानगरपालिकेने कर भरण्यासाठी नागरिकांना विशेष सुविधा पुरविल्या आहेत. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या काळात, सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांमध्येही महानगरपालिकेची नागरी सुविधा केंद्रे सुरू राहणार आहेत. करदाते ऑनलाईन किंवा सुविधा केंद्रांवर जाऊन आपला कर भरू शकतात.

थकबाकीदारांना कायदेशीर कारवाईचा इशारा
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनेक मालमत्ताधारकांनी वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनांनंतरही कर भरण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता कर व पाणीपटटी थकवणार्‍यांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर अटकावणी प्रक्रिया सुरू करण्याचे ठरवले आहे.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन
मालमत्ता कर विभागाने नागरिकांना अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. योजनेच्या माध्यमातून मिळणार्‍या सवलतींमुळे थकीत करदाते कमी आर्थिक ताणातून आपली थकबाकी भरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन आपल्या थकीत मालमत्ता कर व पाणीपटटीची रक्कम भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे. महानगरपालिकेची ही योजना नागरिकांना सवलतीचा लाभ देऊन वसुली प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.