HomeमहामुंबईठाणेDombiwali : डोंबिवली पश्चिमेत दूषित पाणीपुरवठा

Dombiwali : डोंबिवली पश्चिमेत दूषित पाणीपुरवठा

Subscribe

जलवाहिन्या तुटल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न

डोंबिवली । येथील पश्चिम नवा पाडा येथील सुभाष रोड परिसरात गटार बांधकाम सुरू आहे. घाईघाईने केलेल्या कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटार तोडण्यासाठी झालेल्या खोदकामादरम्यान अनेक इमारतींच्या जलवाहिन्या तुटल्या असून नागरिकांना दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. सुभाष रोड परिसरातील गटार बांधकामासाठी दोन्ही बाजूचे खोदकाम करण्यात आले आहे. अरुंद रस्ता असल्यामुळे एकाच बाजूचे काम पूर्ण केल्यानंतर दुसर्‍या बाजूचे काम करणे आवश्यक होते, मात्र ठेकेदाराने फक्त वेगाने काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने नियोजनशून्य पद्धतीने काम केले. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

या खोदकामामुळे विश्वंभर दर्शन, यशराज होम, सुदामा टॉवर, घनश्याम कॉम्प्लेक्स, मातृप्रेरणा सोसायटी, कुलकर्णी सदन, उमाकांत निवास, निळकंठ तीर्थ आणि व्यंकटेश सदन या इमारतींना दूषित पाणी पुरवठा होत आहे. परिणामी, या भागातील नागरिकांना उलट्या, जुलाब, मळमळ यांसारखे आजार होत आहेत. मनसेचे माजी परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाला या प्रकरणी पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रल्हाद म्हात्रे यांनी दिला आहे. संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.