HomeमहामुंबईठाणेDombiwali : दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील वादाचा इतिहास आणि दोन्ही शिवसेनेचे आंदोलन

Dombiwali : दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील वादाचा इतिहास आणि दोन्ही शिवसेनेचे आंदोलन

Subscribe

डोंबिवली : कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिर आणि मशीद वादावर अखेर सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवी मंदिरच असल्याचा निर्वाळा दिला आहे. या निर्णयामुळे मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर तोडगा निघाला असून, धार्मिक तणाव शांत होण्याची अपेक्षा आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील धार्मिक स्थळांच्या स्वामित्वावरून गेल्या काही दशकांपासून वाद सुरू होता. बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाकडून किल्ल्यातील मशिदीत नमाज अदा केली जात होती. त्याचवेळी मंदिराच्या दर्शनासाठी बंदी घालण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली. याच कारणामुळे दोन्ही समुदायांमध्ये वाद निर्माण होऊन धार्मिक तणाव वाढत होता. मागील काही वर्षांपासून या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. अनेक पुरावे आणि ऐतिहासिक नोंदींच्या आधारे न्यायालयाने या प्रकरणाचा अंतिम निर्णय दिला. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.

दुर्गाडी किल्ल्याच्या वादाला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. ९० च्या दशकात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी या वादावर आवाज उठवून घंटानाद आंदोलनाची सुरुवात केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू धर्मीयांनी किल्ल्यावर मंदिर उघडण्याची मागणी केली होती. त्यानंतरही या वादाला वेगवेगळ्या काळांमध्ये राजकीय आणि सामाजिक स्वरूप मिळत गेले. या वर्षी जून महिन्यात बकरी ईदनिमित्त दुर्गाडी मंदिर बंद ठेवण्यात आल्यानंतर दोन्ही शिवसेना गटांनी (एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे) पुन्हा घंटानाद आंदोलन केले. मंदिरात प्रवेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे वादाला पुन्हा एकदा जोर चढला होता. न्यायालयीन निर्णयानंतर दुर्गाडी किल्ल्यावरील वाद मिटण्याची अपेक्षा आहे. धार्मिक स्थळाच्या स्वामित्वावरून निर्माण झालेला वाद आणि त्यानंतरची आंदोलने यामुळे अनेकदा पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला होता. दरवर्षी वाढणार्‍या धार्मिक तणावामुळे हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला होता. या निर्णयामुळे कल्याण परिसरातील धार्मिक तणाव कमी होऊन शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.