ठाणे । आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर नवी मुंबई, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन ‘एमएमआरडीए’ला ‘डीपीआर’ तयार करण्याचे आदेश देण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कल्याण येथे केले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ऑनलाईन भूमीपूजन सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, विधान परिषद सदस्य रमेश पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त इंदू राणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला झाला. यावेळी कै.दिलीप कपोते बहुमजली वाहनतळ, पात्र प्रकल्पबाधितांना सदनिका वितरण, अग्निशमन केंद्र मुख्यालय आधारवाडी आणि प्रभाग क्षेत्र कार्यालय, अमृत 2.0 अंतर्गत गौरीपाडा येथे 95 द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील नवीन जलकुंभ बांधणे, या कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न झाले. त्याचबरोबर सिटी पार्क आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्प अंतर्गत प्राप्त ई-बसेसचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रत्यक्षात लोकार्पण करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज कल्याण डोंबिवलीच्या जनतेसाठी मोठ्या प्रमाणात विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण होत आहे. कल्याण डोंबिवली शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणार्या प्रकल्पांचे भूमीपूजन होत आहे. मुंबईप्रमाणेच कल्याण-डोंबिवली मध्येही डीप क्लिनिंग अभियान सुरू करावे, यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होईल. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, लोकांसाठी ज्या सुविधा द्यायच्या त्या प्रमाणिकपणे दिल्या पाहिजेत. कल्याण- डोंबिवली शहरांना स्मार्ट सिटी करण्यासाठी आवश्यक लागेल तेवढा निधी पुरविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील हे मनोगत व्यक्त करताना म्हणले की, स्मार्ट शहराची संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आणि त्यात कल्याण- डोंबिवली महानगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे याचा विशेष अभिमान आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसह भिवंडी आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत आहेत. त्यांना राज्य शासनाच्या मदतीने सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे, हे शासनाचे कर्तव्यच आहे. आज ज्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण झाले, त्यांचा लाभ येथील नागरिकांना होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त इंदू राणी जाखड यांनी केले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात प्रकल्पबाधित पात्र लाभार्थ्यांना सदनिका चावी वाटप करण्यात आल्या.