ठाणे : राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन ई-बसेसचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील खोपट एसटी डेपो या ठिकाणी झाले. राज्यभरात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेस धावणार असून यामधील अवघ्या दहा इलेक्ट्रिक बस ठाणे जिल्ह्याला मिळणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकारी यांनी सांगितले. यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांच्या वाट्याला इलेक्ट्रिक गाड्या वाढवणे आवश्यक असून अद्याप तरी जुन्या लाल परीच्या गाड्यातून प्रवाशांचा प्रवास होत आहे. यामुळे इलेक्ट्रिक बसमधून वातानुकूलित प्रवास जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांचा होईल का ? असा प्रश्न प्रवाशांना नक्की पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एसटी महामंडळात ठाणे डेपो करीता १२ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस, बोरिवली डेपो करिता १२ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस मिळाल्या असून ह्या बसेस ठाणे- बोरिवली, ठाणे स्वारगेट सुरु आहेत. आता मंगळवारी नवीन ५१५० नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यामधील अवघ्या दहा इलेक्ट्रिक बसेस ठाणे डेपोला मिळणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील ५ गाड्या ठाणे- बोरिवली आणि ५ गाड्या ठाणे – भाईंदर या मार्गावर धावणार आहेत. मग जिल्ह्यातील इतर एसटी डेपोत इलेक्ट्रिक बसेस कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या दहा गाड्या ठाणे डेपो करिता मिळणार असतील तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांचा जुन्या एसटी गाड्यामधूनच प्रवास होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्र्यांची अचानक शौचालय पाहणी
राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन ई-बसेसचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खोपट एसटी स्थानकाची अचानक जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी एसटी स्थानकातील स्वच्छतागृह आणि एसटी कर्मचाऱ्यांची विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी ही स्वच्छतागृह पुरेशी स्वच्छ नसल्याचे तसेच विश्रांतीगृहात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ त्यात बदल करण्याचे तसेच कर्मचाऱ्याना अंघोळीला गरम पाणी मिळावे, यासाठी गिझर, पिण्यासाठी गार पाणी मिळावे यासाठी कुलर तसेच स्वच्छ स्वच्छतागृह तयार करावे असे सांगितले तसेच ठाणे येथील खोपट एसटी स्थानक मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे असे निर्देश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ. माधव सुपेकर यांना दिले.