कल्याण । कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरातील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आई एकवविरा महिला मंडळ आक्रमक झाले आहे. येत्या १४ एप्रिल पर्यंत रस्ता न बनविल्यास १५ एप्रिलपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आई एकविरा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सोनी क्षीरसागर यांनी दिला आहे.
गेल्या १० वर्षापासून संपूर्ण अडिवली परिसर हा महानगर पालिकेत असून गेल्या ५ वर्षापासून आई एकविरा महिला मंडळाच्या वतीने पत्राद्वारे ऑस्टिन नगर, अजंनाबाई गॉर्डन येथील रस्त्याची अवस्था वारंवार आपल्या केडीएमसीच्या अधिकारी यांच्या निर्दशनास आणून दिले आहे. आजपर्यंत कोणत्याही प्रकारची रस्त्यांची सुधारणार करण्यात आली नाही.
या मंडळाच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने गेल्या २ वर्षापूर्वी २२ फेब्रुवारी २०२३ रोजी महानगरपालिकेवर निषेध आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी शहर अभियंता यांच्या कार्यालयात लिखित स्वरूपात ४ महिन्यात रस्ता बनवून देणार असे पत्र लिहून देण्यात आले होते. मात्र दोन वर्ष उलटून देखील हा रस्ता बनविण्यात आला नाही. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवडयात रस्त्याच्या कामाची सुरूवात करण्यात आली नाही तर मंडळ आणि नागरिकांच्या वतीने १५ एप्रिल रोजी केडीएमसीच्या मुख्य कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा क्षीरसागर यांनी दिला आहे.