Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेKalyan : कल्याण-तळोजा मेट्रो कामाला गती देणार-आमदार राजेश मोरे

Kalyan : कल्याण-तळोजा मेट्रो कामाला गती देणार-आमदार राजेश मोरे

Subscribe

डोंबिवली । कल्याण-तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या कामाला गती मिळावी आणि बाधित शेतकर्‍यांना योग्य मोबदला वेळेत मिळावा, यासाठी आमदार राजेश मोरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. या बैठकीत मेट्रो मार्गात येणार्‍या अडथळ्यांवर उपाययोजना, बाधित गावांचे पुनर्वसन आणि ग्रामस्थांना आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या मेट्रो प्रकल्पात अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना न्याय्य मोबदला मिळावा आणि त्याचा विलंब टाळता यावा, यावर भर देत आमदार मोरे यांनी एमएमआरडीएचे उपाध्यक्ष अविनाश मुदगल, अतिरिक्त आयुक्त पद्माकर रोकडे आणि प्रकल्प अधिकारी बसवराज यांच्यासोबत बैठक घेतली.

शेतकर्‍यांच्या हितसंबंधांवर भर
या प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या ग्रामस्थांचे गावपण कायम राहावे आणि त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार मोरे यांनी विशेष मागणी केली. शेतकर्‍यांना लवकरात लवकर मोबदला मिळावा, यासाठी एमएमआरडीए सकारात्मक असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे मेट्रो प्रकल्प आणखी वेगाने पूर्ण होईल, असा विश्वास आमदार मोरे यांनी व्यक्त केला.

कल्याण-डोंबिवलीसाठी महत्त्वाचा प्रकल्प
कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई दरम्यानची वाहतूक सुलभ करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून हा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या कामाचा वारंवार आढावा घेतला जात असला, तरीही कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे देखील स्थानिक समस्यांकडे विशेष लक्ष देत आहेत.

कामाच्या गतीसाठी सूचना
या बैठकीत प्रकल्पाच्या अडथळ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मेट्रोचे काम जलदगतीने पूर्ण करून लवकरात लवकर प्रवाशांसाठी खुलं करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत डोंबिवली शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण आणि आमदार मोरे यांचे स्वीय सहाय्यक सतीश मोडक उपस्थित होते.