कल्याण । कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील अ प्रभागाचे यापूर्वीचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना अनधिकृत बांधकाम रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील ६५ इमारतींचा रेरा घोटळा प्रकरणी अनधिकृत बांधकाम प्रश्नावरून न्यायालयाने केडीएमसीला फटकारले आहे. त्यानंतर जागे झालेल्या पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
असे असताना देखील अ प्रभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या कारकिर्दीत अनधिकृत बांधकामे अ प्रभाग क्षेत्रात वाढली. टिटवाळा रिंग रोड लगत इंदिरा नगर, गणेश नगर, बल्याणी, उभर्णी, मोहीली, गाळेगाव, मोहने, अटाळी, आंबिवली, बंदरपाडा, शहाड आदी परिसरात वाढत्या अनधिकृत बांधकामाप्रश्नी तक्रारी पाहता सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी किरकोळ कारवाई करीत एक प्रकारे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याबाबत केडीएमसी आयुक्त इंदू राणी जाखड यांनी देखील अनाधिकृत बांधकामावर ठोस कारवाई करा अशी समज संदीप रोकडे यांना दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली. परंतु यातून त्यांनी बोध न घेतला नाही. अशातच त्यांची बदली झाली. आणि अखेर अ प्रभागातील अनधिकृत बांधकाम प्रश्नी त्यांच्यावर ठपका ठेवित अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्यासहीनिशी संदीप रोकडे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.