HomeमहामुंबईठाणेKalyan : Mahavitaran : वीजबिल ऑनलाइन भरा आणि स्मार्ट फोन जिंका

Kalyan : Mahavitaran : वीजबिल ऑनलाइन भरा आणि स्मार्ट फोन जिंका

Subscribe

महावितरणची ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’

कल्याण । सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणार्‍या लघुदाब वीजग्राहकांना महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू केली आहे. यात प्रत्येक उपविभागस्तरावर पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत. एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार असून कल्याण आणि भांडुप परिमंडलातील ८२ उपविभागांसाठी एकूण १२३० बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. लकी डिजिटल ग्राहक योजनेत प्रत्येक उपविभागासाठी प्रथम : एक स्मार्ट फोन, द्वितीय : दोन स्मार्ट फोन आणि तृतीय क्रमांकासाठी बक्षिस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ असे प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यासोबतच प्रत्येक बक्षिसासाठी दोन विजेत्यांची प्रतीक्षा यादी राहणार आहे. संपर्क करूनही विजेत्यांनी १० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी व इतर कारणांमुळे अपात्र ठरल्यास प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बक्षिसे देण्यात येतील. तसेच ही योजना महावितरणच्या विद्यमान कर्मचार्‍यांना लागू नाही.

कल्याण परिमंडलांतर्गत कल्याण एक आणि दोन, वसई, पालघर या चार मंडल कार्यालयातील ४० उपविभाग येतात. तर भांडुप परिमंडलांतर्गत ठाणे, वाशी आणि पेण या तीन मंडल कार्यालयातील ४२ उपविभाग येतात. या प्रत्येक उपविभागासाठी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतील लकी ड्रॉमध्ये प्रत्येकी पाच बक्षिसे असे एकूण १ हजार २३० बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ग्राहकांना १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येईल. तसेच मागील महिन्याच्या वीजबिलाची दहा रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार असून योजनेच्या कालावधीत ग्राहक/ ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील.

१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीजबिल ऑनलाइन भरलेले नाही, अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. लकी ड्रॉचा निकाल संबंधित महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाइटवर व नोंदणीकृत मोबाईलवरही जाहीर होईल. या योजनेबाबत महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइटवर अधिक माहिती उपलब्ध आहे.