कल्याण । डोंबिवली पूर्वेतील नांदिवली भागात एका गृहसंकुलात सोसायटीत सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकु कार्यक्रम करण्यावरून मराठी, अमराठी भाषकांमध्ये वाद झाला. मराठी भाषक आपला धार्मिक कार्यक्रम करण्यावर ठाम होते. तर अमराठी भाषक हा कार्यक्रम होऊ देणार यासाठी आक्रमक होते. हा विषय पोलीस ठाण्यात गेल्यानंतर मानपाडा पोलिसांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अमराठी भाषकांविरुध्द एका मराठी भाषक महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद भागात एक गृहनिर्माण संस्था आहे. या गृहसंकुलात मराठी आणि अमराठी रहिवासी राहतात. या सोसायटीत हिंदुंचा धार्मिक कार्यक्रम करण्यावरून मराठी, अमराठी असा वाद नेहमीच होतो. यावेळी अमराठी भाषकांनी मराठी भाषकांना त्यांचा दरवर्षीचा सत्यनारायण पूजा, हळदीकुंकू कार्यक्रम करण्यास विरोध केला. हा वाद पोलीस ठाण्यात आल्याने आम्ही अमराठी भाषकांविरुध्द एका मराठी भाषक महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिली. मराठी भाषक महिलेने माध्यमांना सांगितले, आमच्या गृहसंकुलात सत्यनारायण पूजा किंवा हळदीकुंकू कार्यक्रम करण्यासाठी आम्ही सोसायटी सदस्यांकडून किंवा सोसायटी चालकांकडून वर्गणी मागितली नव्हती. आम्ही स्वखर्चाने हा कार्यक्रम करत आहोत. या कार्यक्रमाची माहिती सोसायटीच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली. या कार्यक्रमाची चर्चा सोसायटीच्या व्हॉटस अपग्रुपवर सुरू करण्यात आली. ही चर्चा सुरू असताना अमराठी भाषकांनी हा कार्यक्रम सोसायटीत होऊ द्यायचा नाही, अशी भूमिका घेतली.
आम्ही महिला हा कार्यक्रम स्वखर्चाने करत आहोत. यामध्ये सोसायटीचा पैसा नाही. अशी भूमिका घेऊन हा कार्यक्रम करायचाच यासाठी आम्ही महिला सोसायटी आवारात जमलो. तेव्हा अमराठी व्यक्तीने आम्हाला शिवीगाळ करत हा कार्यक्रम करण्यास विरोध केला. अमराठी भाषक आमच्या कार्यक्रमाला विरोध करतात म्हणून आम्ही मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, असे सांगितले. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये कल्याणमध्ये धूप अगरबत्ती लावण्यावरून मराठी आणि परप्रांतीयांमध्ये वाद उफाळून आला होता. याप्रकरणात सरकारी अधिकारी असलेला एक परप्रांतीय अधिकारी अडचणीत आला.सरकारने त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. रेल्वे स्थानक भागात भाजीपाला, फळ विक्री व्यवसाय करणारे परप्रांतीय विक्रेते, फेरीवाले मुजोर झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
आपण महाराष्ट्रात राहतो. येथे नोकरी, व्यवसाय करतो. त्यामुळे किरकोळ कारणांवरून कोणीही मराठी, अमराठी वाद निर्माण करू नये. असे कोणी करत असेल तर मात्र मनसे पद्धतीने संबंधितांना त्याची जाणीव करून दिली जाईल.
-मनोज घरत, माजी शहराध्यक्ष, मनसे, डोंबिवली
सोसायटीत रहिवाशांनी एकोप्याने राहावे असे अपेक्षित असते. नांदिवलीतील गृहसंकुलात मराठी नागरिकांच्या एका धार्मिक कार्यक्रमात अमराठी नागरिक अडथळे आणत होते. हा विषय पोलीस ठाण्यात आला. जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याने अमराठी व्यक्ति विरुध्द एका मराठी भाषक महिलेच्या तक्रारीवरून गु्न्हा दाखल केला आहे.
-विजय कादबाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे