कल्याण । नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या १४ गावांना वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध दर्शविल्यानंतर याठिकाणचे राजकारण चांगलेच तापले आहे. या १४ गावांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी होती. आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करून गावे वार्यावर सोडायची हा प्रकार सुरू असल्याची टीका मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून या १४ गावांसाठी निधी जाहीर करावा, नवी मुंबईला जोडणारा आडीवली भूतीवली बोगदा रस्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण करावा अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.
राजू पाटील यांनी सांगितले कि, १४ गावे नवी मुंबईत घेण्याबाबत मी जेव्हा लक्षवेधी टाकली होती, तेव्हा गणेश नाईक यांनी जी मागणी केली होती त्याच मागणीवर ते ठाम आहेत. तत्कालीन नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले होते, याठिकाणी ५ हजार ९०० कोटी येथील इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तर गावांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ५९१ कोटी खर्च करावे लागतील. काही अतिक्रमणे काढावी लागतील. तीच मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. त्यांच्या मागणी नुसार या बजेटमध्ये तरतूद करणे आवश्यक होते. येथील आमदारांनी देखील या गावांसाठी मागणी करणे आवश्यक होते. या गावाबाबत आपला पाठपुरावा सुरू होता समिती देखील सोबत होती. तरी देखील हा रेंगाळण्याचा विषय आहे? का असा सवाल करत असून ही १४ गावे कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची आहेत का? नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी लक्ष दिले पाहिजे, असे राजू पाटील यांनी संगितले. त्यामुळे ही १४ गावे आगरी बहुल गावे असून या गावांबाबत सहानभूतीने विचार करून यावर मार्ग काढावा, अशी मागणी मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.