कल्याण । कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळील निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या दोन पुलापैकी एक पूल हा पाच दिवस वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. जलदगती रेल्वे काँरिडार अंतर्गत रेल्वेच्या कामासाठी हा पूल बंद राहणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी रात्री 12 ते 10 फेब्रुवारी रोजी रात्री 12 या पाच दिवसांच्या कालावधीत एक पुलावरील वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहनांना पलावा जंक्शनकडे येण्यास बंदी आहे.
दिल्ली ते जेएनपीटी जलदगती रेल्वे मालवाहू कॉरिडॉर विभागाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. हा रेल्वे मार्ग शिळफाटा येथे पलावा जंक्शन एक्सपेरिया मॉलजवळील निळजे रेल्वे उड्डाण पुलाखालून जाणार आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुच्या पृष्ठभागालगतचे भरावाचे काम पूर्ण झाले आहे. विभागाकडून निळजे रेल्वे मार्गावरील पुलाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. शिळफाटा रस्त्यावरील सततच्या वाहन वर्दळीत ही कामे करणे शक्य नसल्याने रेल्वेने पाच दिवस पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक पाच दिवस बंद ठेऊन ही कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनकडे जाणारी अवजड वाहनांचा प्रवास बंद ठेवण्यात येणार आहे.