Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेKalyan : Thane : Crime : अंमली पदार्थ विक्री करणारे ४ जण ताब्यात

Kalyan : Thane : Crime : अंमली पदार्थ विक्री करणारे ४ जण ताब्यात

Subscribe

पोलिसांची धडक कारवाई सुरूच

कल्याण । कल्याण परीमंडळ ३ मध्ये बेकायदा कामांवर कारवाई करण्याकरीता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण आणि पोलीस पथक हे संयुक्तरित्या खाजगी वाहनाने गस्त करीत असतात. अशी गस्त करताना मानपाडा पोलीस स्टेशन हददीत सुदर्शन मार्बल समोर, सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे सनिल श्रीनाथ यादव (२५) हा तरुणाची तपासणी केली. त्यावेळी त्याच्याकडे एकूण ८.४८ ग्रॅम वजनाचा १६ हजार ५०० रुपये किंमतीचा एमडी अमली पदार्थ आढळला. त्यानंतर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलीस स्टेशन हददीत दुर्गामाता चौक येथील मोकळया जागेत शंकर महादेव गिरी (४६) याच्याकडे ९ किलो ९५० ग्रॅम वजनाचा १ लाख रुपयांचा गांजा आढळला. त्याच्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीत स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या मोकळया जागेत सचिन कावळे (३२),अमन गुप्ता उर्फ पप्पु (१६) या दोघांच्या ताब्यात २३.५३ ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ आणि १० ग्रॅम वजनाचे चरस आढळले. या दोन्ही पदार्थांची किंमत ९३ हजार ९४३ रूपये आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच परिमंडळ ३ कल्याणमध्ये १ जानेवारी ते आजपर्यंत विशेष अंमली पदार्थ कारवाई पथकामार्फत अंतर्गत एकुण १३ गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यात १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६३ ग्रॅम एम.डी. पावडर, २३२ कोडीनयुक्त बॉटल आणि नशेच्या गोळ्या तसेच ४७ किलो ४४ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकुण १२ लाखांपेक्षा जास्त रुपये किमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रशांत चव्हाण, पोलीस कर्मचारी शांताराम कसबे, शिपाई गौतम जाधव, राजेंद्र सोनावणे यांच्या विशेष पथक तसेच डोंबिवली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जावदवाड, पोलीस अधिकारी कोकरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुंड, पोलीस अधिकारी राळेभात आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुकले, पोलीस अधिकारी राठोड यांच्याकडून कामगिरी करण्यात आली आहे.