Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेShahapur : हवामानबदलामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल 

Shahapur : हवामानबदलामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल 

Subscribe

सकाळी थंडी, दुपारच्या उन्हामुळे पिकांवर रोग

शहापूर । पावसाळ्यामध्ये शहापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी भात पिकाची लागवड करत असतात. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात शहापूर तालुक्यातील बहुतांशी शेतकरी भाजीपाला पिकाची लागवड करत असतात. ज्यांच्याकडे बर्‍यापैकी सिंचनाची सोय आहे. असे जवळपास ७० टक्के शेतकरी भेंडी, कारली, घोसाळी, मिरची, काकडी, गवार, ढोबळी मिरची अशा प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. मात्र यावर्षी लहरी हवामानामुळे भाजीपाला पिकाला अवकळा लागली असून मशागत, मजुरी, बियाणे लावलेली मुद्दल आणि केलेली उसनवार देखील मिळणार नसल्याचे संकेत शेतकर्‍यांना दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.
यावर्षी पहाटेच्या वेळी थंडी आणि दमट वातावरण तर दुपारी कडक उन असे लहरी हवामान काही दिवसापासून असल्याने भाजीपाला पिकावर व्हायरस, दावणी, करप्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. शेतकर्‍यांना यावर्षी लावलेली मुद्दल आणि झालेल्या खर्च देखील मिळेल की नाही याची चिंता सतावत आहे.

वर्ष २०२५                     वर्ष २०२४
भेंडी २४ ते २६ रुपये.        ४० ते ४५ रुपये
कारली २२ ते २४ रुपये      ३५ ते ४० रुपये
मिरची. ३५ ते ४० रुपये      ६० रुपये
घोसाळी २० ते २२ रुपये      २५ रुपये

गेल्या वर्षी भाजीपाला लागवडीतून चांगले उत्पन्न मिळाले होते. मात्र यावर्षी लहरी हवामानामुळे आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे लागवडीचा बियाण्यांचा आणि मजुरीचा खर्च देखील जेमतेम मिळेल की नाही याची शंका आहे.
– नितीन पाटोळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, शेंद्रुण