Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेShahapur : Kasara : कसारा घाट जुना रस्ता वाहतुकीसाठी बंद

Shahapur : Kasara : कसारा घाट जुना रस्ता वाहतुकीसाठी बंद

Subscribe

रस्ते दुरुस्तीच्या कामाचे निमित्त

शहापूर । मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी २४ ते २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च ते ६ मार्च या कालावधीत सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जुन्या घाटातील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी वाहनांना या मार्गावरून बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने पर्यायी मार्गाने अर्थात जव्हार फाट्यावरून घाटनदेवी माता मंदिर मार्गे किंवा नवीन घाट मार्गे वळवण्यात येणार आहेत. छोट्या वाहनातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या दरम्यान अवजड वाहने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई – नाशिक द्रुतगती महामार्गावर असलेल्या जुन्या कसारा घाटात रस्ते डागडुजीचे काम २४ फेब्रुवारी पासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस शाखेचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुरेश कुमार मेकला यांनी संबंधित क्षेत्रातील वाहतूक शाखांना वाहतूक बदल संदर्भात सूचना केल्या आहेत. यात २४ ते २७ फेब्रुवारी आणि ३ ते ६ मार्च दरम्यान अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. पावसाळयापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने घेतला आहे. जुन्या कसारा घाट परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहावी, यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

अवजड वाहनांसाठी असा बदल
मुंबईहून नाशिक आणि नाशिकहून मुंबईकडे जाणार्‍या जड अवजड वाहनांना मुंबई-नाशिक महामार्गावर प्रवेश बंदी असणार आहे. रस्ते दुरुस्ती कामादरम्यान जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. नाशिक ते मुंबई वाहतूक करणारी वाहने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरून यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरून इच्छितस्थळी जातील. त्याचप्रमाणे मुंबई ते नाशिक वाहतूक करणारी वाहने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरून जातील.