HomeमहामुंबईठाणेShahapur : शहापुरातील आघानवाडीत भीषण पाणी टंचाई

Shahapur : शहापुरातील आघानवाडीत भीषण पाणी टंचाई

Subscribe

थेंब थेंब पाण्यासाठी महिलांची वणवण

शहापूर । प्रशासकीय व्यवस्थेतील नियोजन शून्य कारभारामुळे शहापूर तालुक्यातील फुगाळा, आघानवाडी, कसाराखुर्द यासह अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. भातसा,
तानसा, मध्य वैतरणा यांसारख्या विशाल धरणांच्या तालुक्यात गेली अनेक वर्षे पाणी प्रश्न घर करून
उभा आहे. फुगाळे, आघानवाडी गावांमधून पाणी टंचाईची दाहकता समोर आल्याने यंदा तालुक्यातील दुष्काळी गावांमधील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट वाढणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यात पाणी टंचाईचे सावट मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यांपासून पाणी टंचाई निर्माण झाल्याने उन्हाळ्यापर्यंत स्थिती आणखी बिकट होणार आहे. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील ग्रामस्थ कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी प्रशासनाविरोधात संघर्ष करत आहेत. मात्र राजकीय पुढार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे आजही टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांना दोन-तीन किलोमीटरपर्यंत पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. फुगाळे, आघानवाडी गावातील महिलांना कोसो दूर जाऊन पाझरत्या झर्‍याचा आधार घेऊन साचलेले पाणी गाळून भरण्याची वेळ आली असल्याचे विदारक
चित्र दिसून येत आहे.

विहिरी कोरड्याठाक, जलस्रोतही आटले
दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे कसाराखुर्द, फुगाळे अन्य भागातील विहिरींचे नैसर्गिक जलस्रोत आटले असून गावातील विहिरींमधील पाणी पातळी खालावली आहे. तर काही ठिकाणी विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर असलेले लहान सहान नैसर्गिक पाझर शोधून हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवसभर वणवण करावी लागत आहे. एक हंडा भरण्यासाठी जवळपास एक तास एक तास निघून जात आहे. गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याच प्रकारची उपाययोजना नसल्याने गावातील महिलांना डोंगर रस्त्याची वाट काढून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

धरणकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाई
तालुक्यात अनेक लहान मोठया नद्या वाहत असल्याने ही निसर्गाने दिलेली एक देणगीच आहे. अन त्याच नद्यांच्या आधारावर भातसा, तानसा, मध्य वैतरणा अशी विशाल जलाशय निर्माण झाली आहेत. धरणाचे पाणी दिसतेय पण घेणार कसे अशी अवस्था धरण परिसरातील दुष्काळी गावांची झाली आहे. योग्य नियोजन होत नसल्याने तालुक्यातील नागरिकांना भर उन्हात लांब वरून डोक्यावर हंड्याने पाणी आणत दैनंदिन गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत.