Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेShahapur : शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट कायम

Shahapur : शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट कायम

Subscribe

जलजीवन मिशन योजनेच्या २४० कोटींच्या योजनेचा बोजवारा

शहापूर । शहापूर तालुका टँकरमुक्त करण्यासाठी सरकारने जलजीवन मिशन योजनेतून १९४ कामे मंजूर केली.मात्र यातील फक्त २१ कामे पूर्ण झाली असून तब्बल १७३ कामे निधीअभावी ठप्प पडली आहेत.अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे.पाणी योजनांच्या रखडपट्टीमुळे शहापूर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या जलजीवन मिशन योजनांचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. ठाणे, मुंबईसारख्या महानगरातील कोट्यवधी जनतेची तहान भागविणार्‍या शहापूर तालुक्याला यंदा पुन्हा पाणीटंचाईचे संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. ग्रामीण भागात जलजीवन मिशनच्या २४० कोटींच्या कामांचा पुर्णपणे बोजवारा उडाला असल्याने गाव पाड्यांवर डोक्यावर हंडे घेऊन महिलांना यंदाही पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.

जलजीवन मिशन योजनेची कामे निधीअभावी लटकल्यामुळे शहापूरला पुन्हा टँकरवरच अवलंबून राहावे लागणार आहे. जलजीवन मिशनची बहुतांश कामे निधीअभावी रखडली आहेत. तर काही पाणी योजनांची कामे ठेकेदार व अभियंत्यांच्या ढिसाळ कारभारामुळे अगदी कासव गतीने सुरू आहेत. किमान चार वर्षे तरी ही कामे पूर्ण होण्याची शक्यता नाही. असे एकंदरीत चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे. शहापूर तालुका टँकरमुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जलजीवन मिशन योजनेतून १९४ कामे मंजूर केली. या पाणीपुरवठा योजनांसाठी २४० कोटींचा कृती आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे. ही कामे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सुरु करण्यात आली, परंतु पुढे या कामांना सरकारकडून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे ही कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. बहुतांश गाव पाड्यांवर सुरू करण्यात आलेली कामे केवळ निधी अभावी रखडलेल्या अवस्थेत असल्याचे अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे. ठेकेदार जेवढे काम करेल तेवढेच पैसे त्याला अदा केले जात आहेत. तर काही ठिकाणी कामे होऊनही निधी नाही, असे कारण सांगितले जात आहे. सरकारकडून वेळेवर निधीच दिला जात नसल्याने परिणामी जलजीवन मिशनच्या १९४ कांमापैकी फक्त २१ कामे कशीबशी पूर्ण झाली आहेत. १७३ कामे अर्धवट अवस्थेत आहेत.

शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेली कामे ठप्प पडली आहेत. ही वस्तुस्थिती आहे. कामांसाठी निधी मिळत नसल्यामुळेच ही सर्व कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. निधी मिळावा यासाठी सातत्याने पत्रव्यवहार सुरु आहे.
– विजया पांढरे, उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, शहापूर