Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेShahapur : शहापूरातील वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात 

Shahapur : शहापूरातील वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात 

Subscribe

माळरानावर शेतात नीलगायींचे कळप, उपद्रवामुळे शेतकर्‍यांना चिंता

शहापूर । शहापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील बहुतांश जंगल हे समृद्धी महामार्ग आणि विविध धरण आणि रस्ते प्रकल्पांसाठी भुईसपाट झाले आहेत. काही वर्षांपासून प्रकल्पांसाठी प्रचंड जंगल तोड झाल्याने येथील दाट, हिरवीगर्द जंगल ही नामशेष झाली आहेत. परिणामी वन्यजीवांचे अधिवास आता धोक्यात सापडले आहेत. दुसरीकडे अन्न पाण्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव जंगल सोडून आता जंगला शेजारील गाव वस्त्यांमध्ये शिरकाव करत आहेत.
येथील जंगलातील नीलगायींचे कळप गाव वस्ती लगत माळरानावर स्थलांतरित झालेले दिसत आहेत. हे वन्यजीव नीलगायींचे कळप शेतकर्‍यांच्या रोज नजरेस पडत आहेत. शिकार आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या नीलगायींचे कळप हे शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना दिसत आहेत. या नीलगायी या भाजीपाला, कडधान्य फस्त करीत आहेत. नीलगायींच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे चिंतेत सापडले आहेत.

शहापूर तालुक्यातील प्रादेशिक विभागाच्या जंगलातील शेणवा मळेगाव, कुडशेत, मुसई बेडीसगाव, परटोली, उंब्रई, कानवे, चेरवली, आष्टा, आदिवासी, लवले, ठुणे आणि किन्हवली परिसरातील शेत माळरानावर सध्या मोठ्या प्रमाणावर नीलगायी आढळून येत आहेत. या निलगायी शेतकर्‍यांनी शेतात लागवड केलेल्या रब्बी हंगामातील हरभरा, वाल, मटकी, इत्यादी कडधान्ये तसेच भेंडी, घोसाळी, शिरवळे, भोपळा, गवार, काकडी आणि पालेभाज्या यांची प्रचंड नासधूस करुन नुकसान करीत आहेत. यामुळे मोठे अर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांच्या आहेत. निलगायींची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव पाहता रब्बी हंगामातील पिके घेण्याचे संकट शेतकर्‍यांनसमोर आता उभे राहिले आहे.
नीलगायींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशःमेटाकुटीला आले आहेत. या नीलगायींच्या समस्येबाबत वन विभागाकडे स्थानिक शेतकरी रोज तक्रारी करीत आहेत. या निलगायींचा उपद्रव थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून होत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. परंतु नीलगाय या वन्यजीव प्राणी असल्याने वनविभागाला याबाबत काहीएक करता येणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. नीलगायींचे कळप काही स्थलांतरित होताना भटकंतीत रस्त्यावर देखील येत आहेत. यावेळी रस्ता ओलांडून जाताना नीलगायीला भरधाव वाहनांची धडक लागून यात अपघात झाल्याच्या घटना देखील येथे घडलेल्या आहेत. हे अपघात रोखण्यासाठी नीलगाय अधिवास असलेल्या संरक्षित क्षेत्रात फलक लावण्यात आलेले आहेत.

नीलगायींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होताच तातडीने घटनास्थळी पाहणी करुन रीतसर पंचनामा करून त्या शेतकर्‍याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जात आहे.
– संजय सावंत वनपाल, शेणवे वनपरिमंडळ, तालुका शहापूर

वाढत्या नीलगायींच्या उपद्रवामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
– मनोहर खाडे, शेतकरी