Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईठाणेशेतकरी आंदोलकांना समर्थन, सरकारचा जाहीर निषेध

शेतकरी आंदोलकांना समर्थन, सरकारचा जाहीर निषेध

Subscribe

शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे धरणे आंदोलन

ठाणे । पंजाब, हरयाणा येथील शेतकरी एमएसपीच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघाले आहेत. मात्र, त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले आहे. त्यांच्यावर गोळीबार, लाठीचार्ज केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकर्‍यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे-पालघर विभागीय महिलाध्यक्षा ऋता आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. हमीभावासाठी कायदा बनवावा आणि स्वामिनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्या या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. हजारोंच्या संख्येने दिल्लीत येऊ पाहणार्‍या या शेतकर्‍यांना दिल्लीच्या बाहेरच थोपवण्यासाठी हरयाणा सरकारने मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक बलाच्या तुकड्या नियुक्त केल्या. दिल्लीच्या सीमेवर तारांचे कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट काँक्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत. आंदोलक शेतकर्‍यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे,यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आंदोलकांनी हातामध्ये, शेतकर्‍यांवर गोळीबार, आता नाही सहन होणार, शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करा, जगाच्या पोशिंद्याला जगू द्या, असे फलक हातात घेतले होते.

दरम्यान, ऋता आव्हाड म्हणाल्या की, शेतकरी वर्ग आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला पहिला राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार हा एकमेव पक्ष आहे. शेतकर्‍यांना हमीभाव मिळावा, यासाठी सन 2021 मध्ये शेतकर्‍यांनी केलेले आंदोलन चिरडण्यात आले होते. सन 2014 पासून शेतकर्‍यांच्या पदरी काहीही पडलेले नाही. स्वामीनाथन आयोगाने शेतकर्‍यांना पेन्शन लागू करण्याची शिफारस केली आहे. त्याची अंमलबजावणी करावी आणि 2021 च्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांस अर्थसाहाय्य द्यावे, या साध्या मागण्या शेतकर्‍यांच्या आहेत. पण, मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर अश्रूधूर सोडण्यात येत आहेत. पंजाबमधील शेतकरी हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचीही अवस्था वाईट आहे. सामान्य माणसाला महाग झालेल्या चैनीच्या वस्तू विकत घ्यायला आवडते. मात्र, शेतकर्‍याचा शेतमाल महाग झाला तर गहजब माजवला जातो. म्हणूनच शेतकर्‍यांना त्यांच्या मेहनतीची कमाई मिळावी, यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत.
या आंदोलनातप्रदेश सेवादल सरचिटणीस तसबीर सिंह, प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे, विद्यार्थी कार्याध्यक्ष राहु पाटील,ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी,असंघटित कामगार सेलचे राजु चापले व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय, पूजा शिंदे, पूजा दामले, स्नेहल फुंडकर, दिलीप उपाडे, वैभव विचारे, आशिष खाडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.