HomeमहामुंबईठाणेKalyan : कल्याण बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या

Kalyan : कल्याण बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या

Subscribe

राज्य निवडणूक प्राधिकरणाचे आदेश, मतदार यादी विलंबाबद्दल ठाणे उपनिबंधकांकडून मागितला खुलासा

कल्याण । राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची प्रारूप मतदार यादी तयार करून तातडीने निवडणूक घेण्याचे आदेश ६ जानेवारी रोजी ठाणे जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. मात्र याबाबत काहीच हालचाल न करता उलट सभापती निवडणूक घेण्यात आली. हा प्रकार जिल्हा निबंधकांनी केला होता. याची गंभीर दखल राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतली आहे. निवडणुकीची प्रारूप मतदार यादी का तयार केली नाही? याचा तातडीने खुलासा ठाणे जिल्हा निबंधकांकडून निवडणूक प्राधिकरणाने मागितला आहे. यासोबतच प्रारूप मतदार यादी तयार करून तातडीने निवडणूक घेण्याचे फर्मानही बजावले आहे. कल्याण बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ मार्च २०२४ मध्येच संपला होता. मात्र शासनाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पुन्हा २२ ऑक्टोबर २०२४ ते २१ एप्रिल २०२५ अशी सहा महिने मुदतवाढ दिली. दरम्यान, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक परिपत्रक काढले. यानुसार ६ जानेवारीपासून राज्यातील निवडणुकीस पात्र असणार्‍या सर्व बाजार समितींची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांना दिले होते.

या आदेशानुसार कल्याण एपीएमसीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठीचा अहर्ता दिनांक निश्चित करून मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास सादर करणे आवश्यक होते. मात्र जिल्हा निबंधकांनी आजतागायत तो सादर केला नाही. याची गंभीर दखल निवडणूक प्राधिकरणाने घेतली असून कल्याण बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना बजावले आहेत.

‘निवडणूक अतितत्काळ’ या मथळ्याखाली कल्याण बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत पत्र ठाणे जिल्हा उपनिबंधकांना धाडले आहे. यात प्राधिकरणाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी जिल्हा उपनिबंधकांवर ताशेरे ओढले आहेत. प्रारूप मतदार यादी तयार करण्यास का विलंब झाला? याचा खुलासा मागितला आहे. ठाणे जिल्हा उपनिबंधक यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याची बाब पणनचे अपर मुख्य सचिव आणि पणन संचालक यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे.