Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेThane : Naresh Mhaske : संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करा-नरेश म्हस्के

Thane : Naresh Mhaske : संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करा-नरेश म्हस्के

Subscribe

ठाणे । भारतीय संस्कृतीशी काही देणेघेणे नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशांचे आपण गेली ७५ वर्ष ‘ऐतिहासिक’ या गोंडस नावाखाली जतन करत आलो आहोत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या संरक्षणाखाली ३,६९१ स्मारके आहेत. परंतु यापैकी २५ टक्के स्मारकांना कोणतेही राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक महत्त्व नसल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतिकांपासून देशाला मुक्त करावे तसेच क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत लावून धरली.
अलिकडेच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस होता. ज्या क्रूरकर्म्याने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी अतोनात छळले, हजारो हिंदू धर्मियांची मंदिरे तोडली, अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील खुलताबाद येथे आहे. त्या कबरीचे संरक्षण एएसआय करत असून ही बाब संतापजनक आणि लज्जास्पद असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा अंतर्गत १०० वर्षे जुने असण्याचा निकष आजच्या भारतासाठी अप्रासंगिक बनला आहे. भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाच्या तुलनेत १०० वर्षांची मर्यादा खूपच कमी आहे, असे म्हस्के म्हणाले. एएसआयने संरक्षित केलेल्या स्मारकांच्या यादीचा पुन्हा आढावा घ्यावा आणि फक्त तीच स्मारके संरक्षित केली पाहिजेत जी खरोखरच भारताच्या संस्कृतीचे, इतिहासाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत, असे म्हस्के यांनी संसदेत स्पष्ट केले.