Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेThane : क्लस्टर योजना विकासकांना आंदण देऊ नका

Thane : क्लस्टर योजना विकासकांना आंदण देऊ नका

Subscribe

आमदार केळकर यांच्याकडून ठामपाला इशारा

ठाणे । ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक आणि अनधिकृत इमारती आणि झोपडपट्टयांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतीकारक आहे. मात्र, आतबट्टयाचे व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर योजना विकासकांना आंदण देऊ नका, असे परखड बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावले आहेत. गुरुवारी आमदार केळकर यांनी नागरिकांसमवेत ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.
भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लटर योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध भागात ४८ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले. क्लस्टर सारख्या महात्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा, अशोक नगर, आझादनगर, गणेश नगर तसेच मनोरमा नगर भागात कार्यालय थाटुन दंडेलशाही करणार्‍या विकासकांच्या विरोधात नागरिकांमध्ये क्लस्टर बाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

यापूर्वी अधिवेशनात आमदार केळकर यांनी अशा हजारो झोपडीधारकांची बाजू मांडली असल्याने या भागातील नागरीकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारींचा पाढा आमदार संजय केळकर यांच्याकडे वाचला. त्यानंतर गुरुवारी आमदार केळकर यांनी नागरिकांसह थेट ठाणे महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी, नागरीकांनीही अधिकार्‍यांकडे क्लस्टर संदर्भातील शंका मांडल्या. यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अन्य अधिकार्‍यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर क्लस्टरसाठी झोपड्यांचे सर्वेक्षण म्हणजे अंतिम मंजुरी नसल्याचा विश्वास रहिवाशांना दिला. तसेच क्लस्टरविषयी शंका असेल तर प्रशासनाने जाहीर सभा अथवा बैठका घेऊन रहिवाशांचे शंका निरसन करावे. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही तक्रारदारांच्या तक्रारी ऐकुन घ्याव्यात, असे सक्त निर्देश देत क्लस्टर योजना विकासकाला आंदण देऊ नका, असे प्रशासनाला बजावले.