ठाणे । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी राबोडी परिसराचा दौरा केला. या दौर्यात त्यांनी कब्रस्तानाची पाहणी केली. तसेच विविध नागरी सुविधांचीही पाहणी केली. विशेष म्हणजे, या दौर्यात अनेक अबालवृद्धांनी डॉ.जितेंद्र आव्हाड यांना थांबवून आपल्या समस्या आणि अडचणी सांगितल्या. तर, डॉ. आव्हाड यांनी देखील त्या समस्यांचे उपस्थित अधिकार्यांकडून तत्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केला. पंधरा दिवसांनी आपण पुन्हा येथे येणार आहोत. येथील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा ठेवतो, असे म्हणत प्रशासनाला गर्भित इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. तसेच जमील शेख खून प्रकरणातही एक ‘आका’ असल्याचे त्यांनी सांगितले.
राबोडी येथे काही वर्षांपूर्वी गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या जमील शेख याच्या कुटुंबियांची आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. त्यावेळी जमील शेख यांच्या दोन्ही मुलींनी आणि पत्नीने आपली कैफियत डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडली. त्यावर जमील हा खूप चांगला कार्यकर्ता होता. त्याच्या मुलींच्या मागे आपण उभे आहोत, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शेख कुटुंबियांना आश्वासित केले. तर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जमील शेख खून प्रकरणाची चौकशीच झालेली नाही. त्यामुळे फेरचौकशीची मागणी करताच येत नाही. आधी जमीलच्या खुनाची सखोल चौकशी व्हायला हवी.
या प्रकरणात पोलीस आणि गुन्हेगार यांची हात मिळवणी झालेली आहे. त्याशिवाय गुन्हेगार सुटूच शकत नाहीत. या खुनातही एक ‘आका’ आहे. पण, पन्नास खून करणारा वाल्मिक कराड जेलमध्ये गेला आहे. त्याच्यापेक्षा मोठा गुन्हेगार हा नाही. तो पण आता आत जाईल, या प्रकरणात तपास करणार्या एका अधिकार्याची बदली करण्यात आली आणि त्याचे स्टेटस ठेवण्यात आले होते. त्यामुळे आपलीही बदली होईल, या भीतीने अन्य अधिकारी या केसमध्ये हात घालत नाहीत, असा आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या दौर्यादरम्यान एका वृद्धेने डॉ. आव्हाड यांना थांबवून रस्ता रुंदीकरणात आपल्या दोन घरांपैकी एक घर पूर्णपणे बाधीत झाले आहे. मात्र, आपणाला त्याबाबत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही, असे सांगितले. त्यावर आमदार आव्हाड यांनी तत्काळ ठामपा अधिकार्यांना फैलावर घेतले.