ठाणे । कळवा ठाणे रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकल रेल्वेतून पडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. मंगळवारी सकाळी गर्दीच्या वेळी कल्याणहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार्या जलद लोकल रेल्वेतून कल्याण पूर्व पावसे नगर येथे राहणारा अनिस अहमद (२६) हा मुंबई येथे कामावर जात असताना गर्दीत दरवाज्यात लोंबकळत प्रवास करीत होता.
कळवा रेल्वे स्थानक सोडल्यावर ठाण्याच्या दिशेने जात असताना त्याचा तोल जाऊन तो पडला. त्यामुळे डोक्याला जोराचा मार लागल्याने तो जबर जखमी झाला. ही माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या कपड्यांमध्ये मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या भावाशी संपर्क साधून त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली.