HomeमहामुंबईठाणेThane: Kalyan : कल्याण लोकसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार

Thane: Kalyan : कल्याण लोकसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार

Subscribe

एमएमआरडीए मुख्यालयात बैठक

ठाणे । कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याकरता महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यासाठी गुरुवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ ची प्रगती, ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. सर्व प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या पूर्णत्वासाठी योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच या प्रकल्प उभारणीतील अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले. यावेळी त्यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वर्गासोबत खालील विषयांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली.

कल्याण लोकसभा क्षेत्रातील महत्वाचे प्रकल्प आणि त्यासाठी आवश्यक जमिनींचे अधिग्रहण, कामांची पूर्तता आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा केली. या प्रकल्पांना गती द्यायची असेल तर लवकरात लवकर जमीन अधिग्रहण करा, अशी सूचनाही यावेळी संबंधित अधिकार्‍यांना केल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त मुद्गल, अतिरिक्त महानगर आयुक्त मनुज जिंदाल, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त जमीर लेंग्रेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रशांत काळे, निलेश शिंदे, नवीन गवळी, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, वामन म्हात्रे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

या मुद्द्यांवर झाली चर्चा
बदलापूर-कांजुरमार्ग मेट्रो मार्ग १४ चा फायदा अधिकाधिक भागाला कसा होईल, त्यासाठी मार्गाच्या आरेखनात बदल करता येईल का याची चाचपणी करणे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील ३८० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील ’यू टाईप’ रस्त्यांना गती देण्यात यावी.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील वर्दळीच्या शहाड उड्डाणपूल रुंदीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने करण्याच्या सूचना उल्हासनगर मनपा आयुक्तांना दिल्या.
उल्हासनगर मनपा क्षेत्रातील प्रमुख ७ रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला.
कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली काटई फ्री वे या प्रकल्पांसाठी वेगाने जागा अधिग्रहीत करण्याची सूचना केली.