Homeमहामुंबईठाणेआरोग्य क्षेत्रातील सुधारणांमध्ये ठाणे अग्रेसर-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आरोग्य क्षेत्रातील सुधारणांमध्ये ठाणे अग्रेसर-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

ठाणे । आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथील मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह पालिका, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली. ठाणेकरांना प्रतिक्षा असलेल्या इंटर्नल ठाणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यता मिळाली. ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी खूप कमी होणार आहे. सध्याच्या फ्रीवेला छेडा नगरपासून ठाण्याच्या आनंदनगरपर्यंत वाढवित आहोत. नवी मुंबईमध्ये मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्य मेट्रो प्रकल्पसुध्दा टप्याटप्प्याने सुरू होतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टेक ऑफसाठी सज्ज झाले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ३३ हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटन झाल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना वेग येतो आहे. आनंदनगर गायमुख बायपास यांचीही कामे होणार आहेत. कल्याण शिळ मार्गावरून आता प्रवास अधिक वेगवान होणार आहे. इथल्या उड्डाणपूलांच्या तीन मार्गिका सुद्धा खुल्या केल्यामुळे वाहनांची आता फारशी कोंडी होत नाही. या मार्गाचं सहा पदरीकरण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सायन-पनवेल महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या मार्गिकेचे उद्घाटन आणि रेवस ते रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजनही मी मुख्यमंत्री असताना झाले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, दहा हजार घरे आम्ही क्लस्टर योजनेच्या माध्यमातून बांधत आहोत. आशियातली ही सर्वात मोठी क्लस्टर योजना असेल. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतून २६ हजार घरे मिळणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या आवास योजनेत मिळून ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने १६ हजार घरे बांधली आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.