ठाणे । अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय समजातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, राजकीय पक्षांचे उमेदवार, विद्यार्थी यांना आपली जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या आधी नवी मुंबईतील कोकणभवन येथील जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे या कार्यालयात प्रचंड गर्दी होत असल्याने ठाणे, कल्याण नवी मुंबई, मिरा भाईंदर येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांना वारंवार हेलपटे मारायला लागत होते. परंतु आता ही त्यांची पायपीट थांबणार असून हे कार्यालय आता कळव्यातील दत्तवाडी बसस्टॉप, खारेगाव येथील सरकारच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन कार्यालयातील तिसर्या मजल्यावर १ जानेवारी पासून सुरू झाले आहे. सध्या वेगवेगळ्या फायली आणि टेबल स्थलांतराची लगबग सुरु झाली आहे.
या आधी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय नसल्याने निवडणूक लढविणार्या उमेदवारांची आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात, विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नवी मुंबई येथील कोकणभवन कार्यालयात सतत फेर्या माराव्या लागत असल्याने त्यांची दमछाक होत असे. पुन्हा त्यांच्या प्रस्तावात काही त्रुटी निघाल्यास वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे आता जातपडताळणी करणार्यांची वेळ आणि पैसा ही वाचणार आहे. आता येथे अर्जदार त्यांच्या जात दाव्याबद्दलचे दावे आणि नवीन अर्जदारांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतचे प्रस्ताव विहीत नमुन्यात ऑनलाईन तसेच मूळ प्रस्ताव या पत्त्यावर जमा करावेत असे आवाहन जात पडताळणी उपायुक्त प्राची वाजे तथा जातपडताळणी सदस्य संशोधन अधिकारी प्रसाद खैरनार यांनी केले आहे.