Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेThane : ठाण्यात पी. सावळाराम स्मृती पुरस्कार प्रदान

Thane : ठाण्यात पी. सावळाराम स्मृती पुरस्कार प्रदान

Subscribe

अभिनेते उदय सबनीस, अभिनेत्री लीना भागवत यांचा सन्मान

ठाणे । ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सन २०२४चा जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर, गंगा-जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना रविवारी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील अरुंधती भालेराव, साहित्य क्षेत्रातील निकिता भागवत यांचा तर, लक्षवेधी कलाकार पुरस्काराने अभिनेते दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही सन्मान खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला.

रविवारी सायंकाळी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या या सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, पी. सावळराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील आणि ओमकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ‘जनकवी पी. सावळाराम पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना प्रदान करण्यात आला. ७५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तर, अभिनेत्री लीना भागवत यांना प्रदान करण्यात आलेल्या गंगा -जमुना पुरस्कारा’चे स्वरुप ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे आहे.

निकिता भागवत, अरुंधती भालेराव व दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे. जनकवी पी. सावळाराम यांची नवीन पिढीस ओळख व्हावी यासाठी, ठाणे महापालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा ठाण्यातील रसिकांनी केलेला गुणवंतांचा सन्मान आहे. साहित्य, संस्कृती, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांचे आयोजन करून कलागुणांना प्रोत्साहन देणारी ठाणे महापालिका एकमेव असल्याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन या पुरस्कार सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी केले. सर्व पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी खासदार म्हस्के यांनी शुभेच्छाही दिल्या.