ठाणे । ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव यंदा शुक्रवार, १४ फेब्रुवारी ते रविवारी १६ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. विश्वनाथ कान्हेरे यांना राज्यस्तरीय तसेच गायिका वेदश्री खाडिलकर-ओक यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या संगीत महोत्सवास रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे तीन दिवस हा महोत्सव होणार असून महोत्सवाचे हे २९वे वर्ष आहे. हा महोत्सव विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आणि पं. राम मराठे कुटुंबीय यांच्यावतीने करण्यात आले आहे. महोत्सवाच्या प्रवेशिका पुढील आठवड्यात डॉ. घाणेकर नाट्यगृह आणि महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी येथे उपलब्ध होणार आहेत.
याही वर्षी महोत्सवात नामवंत आणि ज्येष्ठ कलाकार तसेच नवोदित कलाकार यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचा आरंभ शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पं. राम मराठे यांची नात आणि युवा कलाकार प्राजक्ता मराठे-बिचोलकर यांच्या गायनाने होईल. त्यांना स्वप्नील भिसे आणि ज्ञानेश्वर सोनावणे साथ करणार आहेत. त्यानंतर, सौरव-गौरव मिश्रा यांची कथ्थक जुगलबंदी होईल. पाठोपाठ पं. राम मराठे स्मृती पुरस्कारांचा वितरण सोहळा होईल. पहिल्या दिवसाची सांगता ख्यातनाम ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने होईल. त्यांना अजय जोगळेकर आणि ओजस अधिया साथ करणार आहेत.
शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वा. जुई धायगुडे-पांडे यांच्या गायनाने आरंभ होईल. त्यांना स्वप्नील भिसे आणि सुप्रिया जोशी साथ करणार आहेत. त्यानंतर, युवराज सोनार आणि सतेज करंदीकर यांची बासरी जुगलबंदी होईल. त्यांना तबलासाथ पं. कालिनाथ मिश्रा करणार आहेत. सायं. ६.३० वा. पं. कैवल्यकुमार गुरव यांचे गायन होईल. त्यांना रोहीत देव आणि ज्ञानेश्वर सोनावणे हे साथसंगत करणार आहेत. त्यानंतर, रा. ८.०० वा. सानिया पाटणकर यांचे गायन होईल. त्यांना मंदार पुराणिक आणि अभिनय रवांदे साथ करणार आहेत. तर, त्या दिवसाची सांगता, रा. ९.०० वाजता पं. विभव नागेशकर यांच्या तबला वादनाने होईल.
रविवार, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी विद्याधर गोखले लिखित आणि यशवंत देव यांचे संगीत असलेल्या ’संगीत बावणखणी’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाची निर्मिती विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान यांची आहे. तर, रंगावृत्ती आणि दिग्दर्शन श्रीकांत दादरकर यांचे आहे. त्यानंतर, सायं. ७.३० वा. पं. शौनक अभिषेकी यांचे गायन होईल. त्यांना आनंद जोशी आणि तेजोवृश जोशी तर, महोत्सवाची सांगता ज्येष्ठ वादक प. विश्वमोहन भट आणि सलील भट यांच्या मोहन विणा वादनाने होईल. त्यांना तबलासाथ पं. मुकुंदराज देव करणार आहेत.
सशुल्क बस व्यवस्था
या महोत्सवासाठी राम गणेश गडकरी रंगायतन ते डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह तसेच, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ते राम गणेश गडकरी रंगायतन या प्रवासासाठी ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमार्फत सशुल्क बस व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे.