Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेThane : रस्ते काँक्रिटीकरणाची कामे एकत्र वेगाने करावीत 

Thane : रस्ते काँक्रिटीकरणाची कामे एकत्र वेगाने करावीत 

Subscribe

परिवहन मंत्र्यांचे एमएमआरडीएला निर्देश

ठाणे । गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. तर, घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेने आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावा, असेही निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. गायमुख मेट्रो आणि रस्त्याचे काम एकत्र सुरू केल्यामुळे ती कामे एकाचवेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाही. या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल, मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल. वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाचा अध्यक्ष राजकीय व्यक्ती असतो, मात्र मधल्या काळात एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची या पदावर नेमणूक केली. पुढे गोगावले मंत्री झाल्याने हे पद रिकामे झाले. त्यामुळे या पदावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी मिळणार आहे. तोपर्यंत ही जबाबदारी तात्पुरत्या स्वरुपात प्रधान सचिव संजय सेठी यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याचे राजकीय भांडवल करू नये, मी परिवहन मंत्री म्हणून या खात्याचा प्रमुख असल्या कारणाने सगळी जबाबदारी माझीच आहे. महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी निर्णय घेतले तरी अखेरचा निर्णय माझ्याकडेच असतो, त्यामुळे या विषयाचे राजकीय भांडवल नको. असे सरनाईक म्हणाले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सरकारी निधीतून एमएमआरडीएमार्फत होणार विविध विकास प्रकल्प, नागला बंदर खाडी किनारा विकास प्रकल्प, घोडबंदर रोडवरील वाहतूक परिस्थिती आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. अरविंद पेंडसे सभागृह येथे संपन्न झाली. या बैठकीस, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, एमएमआरडीएचे संचालक (प्रकल्प) अनिल साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

घोडबंदर रोड सेवा रस्ता मुख्य मार्गाशी जोडून घेण्याच्या कामाबाबत सरनाईक यांनी पावसाळ्याच्याआत सर्व बाधित झाडांचे पुनर्रोपण पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेस दिल्या. घोडबंदर रोड परिसरातील अंतर्गत पर्यायी रस्त्यांची जोडणी झाल्यावर मुख्य घोडबंदर मार्गावरील किमान २० टक्के वाहतूक कमी होईल. त्यामुळे हे पाच पॅकेजमधील काम एमएमआरडीएने जलद करावे. त्यासाठी भूसंपादन किंवा इतर आवश्यक सहकार्य ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने समन्वय साधून तातडीने करून द्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
नागला बंदर खाडी किनारा विकास आणि मॅनग्रोव्ह पार्क हे दोन प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्या कामांमध्ये बाधित होणार्‍या पात्र लोकांचे पुनर्वसन तातडीने करण्यात यावे. तसेच, या कामात कोणताही अडथळा येणार नाही, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त घेण्यात यावा, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत, ओवळा-माजिवडा क्षेत्रातील इतर विकास कामांच्या स्थितीचाही आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला. तसेच, समतानगर येथील विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत पुढील आठवड्यापर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी ठाणे महापालिकेस दिले. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत होत असलेल्या कामांची माहिती दिली. गायमुख घाट रस्त्याच्या कामाला वेग मिळणे आवश्यक आहे. तरच पावसाळ्यापूर्वी काम करता येईल, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, सूर्या प्रकल्पातून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी ठाण्याला मिळावे, यासाठी पाठपुरावा सुूरू असल्याचीही माहिती राव यांनी या बैठकीत दिली. गेल्यावर्षी प्रमाणेच सर्व यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून रस्ते स्थितीवर लक्ष ठेवतील आणि दुरुस्तीची कामे पूर्ण केली जातील, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. या बैठकीत, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी मेट्रोची कामांच्या स्थितीचा आढावा घेतला.