ठाणे । ठाणे परिसरात मागील तीन दिवसापासून उन्हाचा पारा वाढत आहे. गुरुवारी ठाण्यातील तपमान ३८ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेल्याने चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. मागील दहा दिवसांपासून ठाणे शहर आणि परिसरातील तापमान ३५ ते ३८ च्या दरम्यान असून त्यामुळे उष्मा वाढला आहे. यामुळे उन्हापासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. उष्णतेची ही स्थिती काही काळ राहील, असा हवामान खात्याचा इशारा आहे. त्या पार्श्वभूमीवर, ठाणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे.
उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
तहान लागली नसली तरी सतत पाणी प्यावे, प्रवासात पाण्याची बाटली सोबत असावी (ओआरएस) घ्यावे. जसे की, लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत ज्यात मिठाचे योग्य प्रमाण वापरावे., ऋतुमानानुसार उपलब्ध असणारी फळे व भाज्या यांचा आहारात उपयोग करावा.शरीर झाकलेले असावे, कॉटनयुक्त सैलसर व सौम्य रंगांचे कपडे वापरावे. उन्हात घराबाहेर असताना टोपी अथवा छत्रीचा वापर करावा. वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही इ. प्रसारमाध्यमातून दिल्या जाणार्या हवामानाबाबतच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.घरातील हवा थंड आणि खेळती रहावी. थेट सूर्यप्रकाशापासून घराचे संरक्षण करावे. घराबाहेर जाणे आवश्यक असल्यास सकाळी आणि सायंकाळच्या वेळेचा उपयोग करावा.
उष्माघात टाळण्यासाठी काय करावे
लहान मुले, गरोदर स्त्रिया, घराबाहेर काम करणारे नागरिक, मानसिक दृष्टया आजारी असलेली व्यक्ती, शारीरिक दृष्टया आजारी असलेले नागरिक आदींनी काळजी घ्यावी. वयस्कर, आजारी व्यक्ती यांनी घरात एकटे राहू नये.
घरात थंडावा राखावा.
हे करु नये
दुपारी १२ ते ३ या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे.शारीरिक श्रमाची कामे करू नयेत.चपला, बुटाशिवाय घराबाहेर जाऊ नये.स्वयंपाक करीत असताना हवा पुरेशी खेळती राहील, याची काळजी घ्यावी.चहा, कॉफी, मद्य यांचे सेवन करू नये. साखरेचे अधिक प्रमाण असलेली पेये घेऊ नयेत. हाय प्रोटीन आहार व शिळे अन्न खाऊ नये.लहान मुले व पाळीव जनावरे यांना पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये ठेवू नये.
उष्माघाताचे परिणाम
शरीराचे तापमान वाढणे.अति उष्म्यामुळे अंगावर रॅश येणे, हातापायांना सुज येणे, मसल्स क्रॅम्प येणे, बेशुध्द पडणे, इत्यादी. उष्माघाताने आधीच असलेल्या आजाराची तीव्रता वाढते. ही लक्षणे आढळल्यास त्वरित काळजी घ्यावी, योग्य उपचार घ्यावेत.चक्कर येणे, बेशुध्द होणे, मळमळ, उलटी, डोकेदुखी होणे. खूप तहान लागणे. लघवी अत्यंत पिवळी होणे. श्वासोच्छवास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे.
उष्माघाताची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला ताबडतोब हवेशीर जागेत न्यावे. पाणी पिण्यास द्यावे.जर मसल क्रॅम्प आला तर वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना त्वरीत बोलवावे. उष्माघातामुळे होणारी कोणतीही लक्षणे (ताप, ग्लानी, संभ्रमावस्था) आढळली तर, ताबडतोब महापालिकेच्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात किंवा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात संपर्क साधावा. तेथे त्वरित उपचार केले जातील.