Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेThane : ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे आयोजन

Thane : ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे आयोजन

Subscribe

ठाणे । ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन ७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी एप्रिल महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच २१ मार्चपर्यंत त्यांचे अर्ज- निवेदने महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावे. हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदना सोबत प्रपत्र-१ (ब) सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र-१ (ब) नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. २६ सप्टेंबर २०१२ नुसार माहे डिसेंबर- २०१२ पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्विकारता, हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये, परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत, तसेच ज्या निवेदनावर १ महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी, एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक, विविध न्यायालयात, लोकआयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे, तसेच राजकीय पक्षाच्या, नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.