Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेThane : सातव्या वेतन आयोगातील फरक द्यावा

Thane : सातव्या वेतन आयोगातील फरक द्यावा

Subscribe

होळीच्या दिवशी कामगारांचे आंदोलन

ठाणे । देशात तसेच राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. मात्र, ठाणे महानगर पालिकेकडून या वेतन आयोगाचा फरक कामगारांना देण्यात आलेला नाही. त्या निषेधार्थ महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे नेते, माजी कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदे यांनी होळीच्या दिवशी म्हणजेच १३ मार्च रोजी ठामपा मुख्यालयासमोर आंदोलन करीत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्याची तजवीज करण्यात आली आहे. त्यानुसार शासकीय कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ आणि इतर भत्ते वाढले आहेत. तसेच, या वेतनाचा फरक कर्मचार्‍यांना देण्याबाबत आदेशही देण्यात आलेले आहेत. मात्र, ठाणे महानगर पालिकेकडून हा फरक अद्याप देण्यात आलेला नाही. या संदर्भात म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे नेते, माजी कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदे यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. शिवाय, २६ जानेवारी रोजी पालिका मुख्यालयासमोर आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यावेळेस पालिका प्रशासनाने पत्रव्यवहार करून हा फरक देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही ह्या फरकाची रक्कम दिलेली नाही. तसेच, निवृत्त कर्मचार्‍यांची देणीदेखील पूर्णपणे दिलेली नाहीत. त्या निषेधार्थ म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे नेते , माजी कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदे यांनी ज्या दिवशी होळी पेटेल त्याच दिवशी दुपारी आम्ही स्वतःला पालिका मुख्यालयासमोर पेटवून घेऊ, असा इशारा दिला आहे. दरम्यान, या संदर्भात आपण पालिकेच्या संबधित अधिकार्‍यांची भेटही घेतली होती. मात्र, योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानेच आपण हे पाऊल उचलत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.