ठाणे । गायमुख येथील कचर्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तेथील दोन प्रकल्पांचे एकत्रिकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा. तीन एकराच्या जागेत सुमारे ३०० ते ४०० टन ओल्या कचर्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खत निर्मिती होईल. राज्यातील अशाप्रकारचा हा मोठा प्रकल्प ठरेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
ठाणे शहर-घोडबंदर रोड परिसरातील चार विकास कामांची पाहणी शुक्रवारी सकाळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उपनगर अभियंता गुणवंत झांब्रे, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या चार महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठा निधी दिला. त्याची कामे आता सुरू झाली आहेत. खत निर्मिती प्रकल्प, नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण, बोरिवडे मैदानाचा विकास, आनंद नगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या कामांची पाहणी केली. त्याबाबत आवश्यक ते निर्देश आणि सूचना अधिकार्यांना देण्यात आल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.तर, परिवहन मंत्री प्रताप सरानाईक यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागेचा वापर करून ३०० ते ४०० टनांपर्यंतच्या ओल्या कचर्यापासून खत निर्मितीचा एकत्रित प्रकल्प करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.