Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेThane : TMC : गायमुख घाट रस्त्याची डागडुजी, डांबरीकरण करावे

Thane : TMC : गायमुख घाट रस्त्याची डागडुजी, डांबरीकरण करावे

Subscribe

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे । वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजी आणि डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र, त्यावरील गायमुख घाट काँक्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. या पार्श्वभूमीवर, आयुक्त सौरभ राव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण व डांबरीकरणाचे निर्देश दिले आहेत.

घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचे पुढील सत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी झाले. या बैठकीस, घोडबंदर रोड येथील ’जस्टीस फॉर घोडबंदर रोड फोरम’चे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ, सहायक संचालक, नगररचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, घोडबंदर रस्ता येथे काम करणार्‍या सर्व यंत्रणांचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम, यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, मिरा- भाईंदर आणि नवी मुंबई येथील वाहतूक पोलीस अधिकारी, मेट्रो, महा मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

कासारवडवली उड्डाणपूल
कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान मेट्रोने ३० आणि ३१ मार्च रोजी तेथील सर्व कामे पूर्ण करून घ्यावीत. तर, पाच आणि सहा एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी. त्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

वॉर्डनची संख्या वाढणार
वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी नेमण्यात आलेल्या वॉर्डनच्या संख्येबद्दल या बैठकीत चर्चा झाली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन पगाराविषयीचे प्रश्न सोडवून जास्तीत जास्त वॉर्डन रस्त्यावरती वाहतूक नियंत्रणासाठी उपयोगी येतील या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त यांनी मेट्रो तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्याचबरोबर, घोडबंदर रोड परिसरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायटी, मॉल, शाळा, व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांच्याकडील एक वॉर्डन हा त्यांच्या हद्दीच्या बाहेर वाहतुकीच्या सोयीसाठी तैनात करावा, असे पत्र महापालिका शहर विकास विभागामार्फत या सर्व आस्थापनांना देणार असल्याचेही आयुक्त राव यांनी सांगितले.

रात्री नऊनंतरच अवजड वाहने
पावसाळ्याच्या काळामध्ये अवजड वाहनांची वाहतूक रात्री नऊनंतरच सुरू करावी. मुंबई आणि नवी मुंबईतून येणार्‍या अवजड वाहनांविषयी समन्वय साधून त्यांचे नियंत्रण करण्यात यावे, अशी सूचना ’जस्टीस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी केली. त्यासंदर्भात वाहतूक विभागाने अधिक चर्चा करून निर्णय घ्यावा, असे आयुक्त राव म्हणाले. दरम्यान, आनंदनगर येथील आरएमसी प्लांटकडे कोणत्याही परवानगी नसल्याने काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. वेगवेगळ्या आठवडी बाजाराला परवानगी देताना बाजार संपल्यानंतर श्रमदानाने महापालिकेच्या कर्मचार्‍यांसोबत काम करून तो परिसर स्वच्छ ठेवण्याची अट परवानगी देतानाच घातली जाईल, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. आनंदनगर मैदानात या आठवडी बाजाराला परवानगी देता येईल का याची व्यवहार्यता तपासून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.याशिवाय, प्रलंबित कामे, सीसीटीव्ही नेटवर्क, सिग्नल परिसरातील रस्त्यांची डागडुजी, खोदकाम करताना विविध यंत्रणांमधील समन्वय आदी मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली.