ठाणे । अमोल कदम : ठाणे शहरात स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर अधिक सुविधा प्राप्त होत आहे. सार्वजनिक शौचालय देखील चकाचक होणार आहेत. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बाजारपेठा, महामार्ग या ठिकाणी कमीत कमी जागेत अत्याधुनिक सर्व सोईसुविधांयुक्त लाईट गेज मिनी कंटेनर शौचालये उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक शौचालयात देखील आवश्यक कामे करून स्वच्छ आणि सुंदर शौचालय करण्यात येणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या बजेट मध्ये सांगण्यात आले. शहरात सार्वजनिक शौचालय कमी प्रमाणात असल्याने गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची कुचंबणा होते. यामुळे ठाणे महानगरपालिकेने जुने सार्वजनिक शौचालयात यांत्रिक पद्धतीने २४ तास पाणी उपलब्ध करून देऊन २४ तास सफाई आणि देखभाल करणार आहे. यामध्ये ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालये २४ तास स्वच्छ राहण्याकरिता आवश्यक कामे करून घेण्यात येणार आहेत. प्रत्येक शौचालयावर ओव्हरहेड टँक बसवण्यात येणार आहेत. तसेच शौचालयामध्ये २४ तास मदतनीस, हेल्पर उपस्थित राहणार आहेत. यासाठी सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लाईट गेज मिनी कंटेनर शौचालये उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील १३ जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. निविदा प्रक्रिया राबवून १० बाय २० मोजमापाचे लाईट गेज मिनी कंटेनर शौचालये उभारण्यात येणार आहेत. शौचालयांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेपैकी ५० टक्के जागेवर महिलांकरिता वेंडिंग मशीन, वॉश बेसिनसह २४ तास पाण्याची सुविधा असलेले स्वतंत्र शौचालय उभारण्यात येणार आहेत. उर्वरित ५० टक्के जागा निविदेद्वारे नियुक्त कंत्राटदारास व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रात शौचालय नूतनीकरणातंर्गत एकूण ७१५ युनिटच्या ९०५४ सीटसचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून मार्च २०२५ पर्यंत ६९९ युनिट्समधील ८७५९ सिट्सचे नूतनीकरण पूर्ण होणार आहे. शौचालयांच्या पुनर्बांधणी अंतर्गत एकूण ८६ युनिट्सच्या ११५१ सीटसच्या पुनर्बांधणीचे कामे घेण्यात आली असून मार्च २०२५ अखेर ४१ युनिट्सच्या ५४५ साइट्सच्या पुनर्बांधणीची कामे पूर्ण होणार आहेत. या कामांसाठी २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात सार्वजनिक शौचालय बांधणेसाठी ५ कोटी रुपये तसेच दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी पायाभूत सुविधेअंतर्गत ६० कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. ही कामे देखील प्रगतीपथावर आहेत.
शौचालयातून गर्दुल्ले हद्दपार करा
एकीकडे स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला जात असताना शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या शौचालयांची दुरवस्था आहे. महिना-महिना या शौचालयांची स्वच्छताच केली जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत. शौचालयात टाकले गेलेले अस्वच्छ कपडे, महिलांच्या शौचालयात पुरुषांचा वावर, विजेची सोय नाही अशा अनेक कारणामुळे शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरत आहे. ठाण्यातील अनेक झोपडपट्टी परिसरात एक हजारहून अधिक घरात शौचालय बांधत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण जागे अभावी सार्वजनिक शौचालयाचा वापरच जास्त प्रमाणात होतो, सार्वजनिक शौचालयात देखील रात्रीच्या वेळी गर्दुल्ले झोपत असल्याने रात्री आणि पहाटेच्या वेळी शौचालयात जाताना महिला वर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यामुळे सार्वजनिक शौचालयातून गर्दुल्यांना हद्दपार करा अशी मागणी नागरीक करत आहेत.