ठाणे । ठाणे महानगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला सन २०२४-२०२५ चा सुधारित ६ हजार ५५० कोटी तर सन २०२५-२०२६ सालचा ५ हजार ६४५ कोटी रूपयांचा मूळ अर्थसंकल्प शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आला. नागरिकांना चांगेल जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटीबद्ध असून अर्थसंकल्पाची त्यादृष्टीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत केले.
सन २०२४-२५ मध्ये रु. ५०२५ कोटी ०१ लक्ष रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणी पुरवठा आकार, करवसुली, जाहिरात, व शहर विकास विभाग या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न रु. ३४५४ कोटी ८३ लक्ष ऐवजी रु.३२२० कोटी ४२ लक्ष सुधारित करण्यात येत आहे. महापालिकेस प्राप्त होणार्या अनुदानाचा विचार करता, मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या रुपये २८४ कोटी ३२ लक्ष अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर २०२४ अखेर रुपये ९१४ कोटी ३५ लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान आणि सहाय्यक अनुदानापोटी रुपये ११६२ कोटी ७१ लक्ष अपेक्षित केले आहे व अमृत २.०० योजनेसाठी रुपये २० कोटी कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु मार्च २०२५ अखेरपर्यंत संबंधित कर्ज घेण्यात येणार नाही.
खर्च बाजूस सन २०२४-२५ मध्ये महसुली खर्च रु. ३३४५ कोटी ६६ लक्ष प्रस्तावित केला होता, तो सुधारित अंदाजपत्रकात रु.३०३४ कोटी ७७ लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च रु.१६७९ कोटी ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च रु.२०६७ कोटी ५० लक्ष सुधारित करण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयक्त प्रशांत रोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, ठाणे परिवहन सेेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (सचिव) उमेश बिरारी व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचवेळी परिवहन उपक्रमाचे सन २०२५-२६चे ८९५ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांना ठाणे परिवहन सेेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सादर केले.
मालमत्ता कर – मालमत्ता कर व फी पासून सन २०२४-२५ मध्ये रु. ८१९ कोटी ७१ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. डिसेंबर २०२४ अखेरचे उत्पन्न रु. ५१२ कोटी ४२ लक्ष विचारात घेवून मालमत्ता करापासून रु.७७६ कोटी ४२ लक्ष सुधारित अंदाज करण्यात येत आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात देखील पहिल्या सहामाही सोबत दुसर्या सहामाहीचा कर भरणार्या करदात्यांना पुढीलप्रमाणे सवलत सूट असणार आहे.
अर्थसंकल्पातील सर्व योजना, अभियान व प्रकल्पांसाठी सन २०२५-२६ मध्ये महसुली खर्च रु. ३७२२ कोटी ९३ लक्ष , भांडवली खर्च रु. १९२१ कोटी ४१ लक्ष , अखेरची शिल्लक रु. ६६ लक्षसह एकूण रु. ५६४५ कोटी खर्चाचे अंदाज प्रस्तावित करण्यात येत आहेत.
दृष्टीक्षेपात अर्थसंकल्प
कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प
महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
खर्चामध्ये वित्तीय शिस्त
पोषक व शाश्वत पर्यावरणाकरीता उपाययोजना
गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामे
महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षण
महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर
प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर
कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष
वृक्षगणना व वृक्षसंवर्धन