ठाणे : अमोल कदम : स्मार्ट सिटीच्या योजेनेतून ठाणे महानगरपालिका स्वच्छतेला प्राधान्य देत असून स्वच्छता मोहिमेकडे देखील भर देत आहे. यामुळे यंदाच्या २०२५-२६ वर्षाकरिता ५ कोटींची तरतूद घनकचरा प्रक्रिया करिता प्रस्तावित ठाणे महानगरपालिकेने केलेली आहे. शासनाच्या स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण ही केंद्रशासन पुरस्कृत योजना असून ठाण्यात या योजनेच्या माध्यमातून स्वच्छतेच्या दिशेने पाऊल पडत आहे. ठाणे जिल्हा हागणदारीमुक्त, वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या माध्यमातून ठाणे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जात आहे. घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याकरिता शासनाकडून ठाणे महानगरपालिकेसाठी भिवंडी तालुक्यातील आतकोली येथे ३५ हेक्टर जागा मालकी तत्वावर देण्यात आलेली आहे.
या जागेवर घनकचरा विभागामार्फत ६०० ते ८०० टीपीडी क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले असून या कामी निविदा प्रक्रिया उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले असून या कामी निविदा प्रक्रिया सुरु आहे. घनकचरा प्रक्रिया प्रकल्प अंतर्गत प्रक्रियेअंती निर्माण होणाऱ्या ऑरगॅनिक वेस्ट पासून खत, बायोगॅस निर्मिती प्रस्तावित आहे. भिवंडी तालुक्यातील आतकोली प्रकल्पासाठी शासनाकडून ५० कोटी रुपये मंजूर असून महापालिका निधीमधून सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात ५ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
ओल्या घनकचऱ्यापासून खत निर्मिती-
महापालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणेसाठी गायमुख जकात नाका येथे एकूण १०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर सोलोराइज्ड मेकॅनिकल कम्पोस्टिंगद्वारे प्रक्रिया करून खत निर्मिती प्रकल्प शासन निधीतून उभारण्यात येत आहे. यामध्ये ७० मेट्रिक टन, २५ मेट्रिक टन, २ मेट्रिक टन क्षमतेचा प्रत्येकी १ प्रकल्प व १. ५ मेट्रिक टन क्षमतेच्या २ मोबाईल कंपोस्टिंग व्हॅनचा समावेश आहे.
बायोगॅस निर्मिती प्रकल्प
शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कॉम्प्रेस बायोगॅस निर्मिती करण्याकरिता प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प ठाणे महानगरपालिकेस घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणेकामी शासनाकडून प्राप्त झालेल्या भूखंडावर स्थापित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये दैनंदिन ३०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे.
शून्य कचरा मोहीम
कचऱ्याचे संकलन चार चाकी घंटागाड्या, सहाचाकी घंटागाड्या व कॉम्पॅक्टद्वारे करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कोणतेही वाहन पोहचू शकत नाही. अशा ठिकाणचा कचरा संकलित करणेकरीता कचरा वाचकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कामाची गुणवत्ता वाढवून शहर कचरामुक्त म्हणजेच शून्य कचरा करण्याकरिता हा कचरा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
सार्वजनिक रस्ते साफसफाई
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण २७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफ सफाई कंत्राटी पद्धतीने करण्यात येते तसेच उर्वरित रस्त्यांची साफसफाई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कायम कामगारांमार्फत करण्यात येते. साफ सफाई होण्याकरिता कामगारांचे २५ गट तयार करण्यात आलेली आहे. दिवसातून दोन वेळा सफाई होत आहे.
सर्वंकष स्वच्छता मोहीम-
महानगरपालिका हद्दीमध्ये प्रत्येक शनिवारी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येते, रस्ते, पदपथ, दुभाजक, चौक, सार्वजनिक प्रसाधनगृहे , शाळा, कार्यालये, रुग्णालये व इतर वस्तू यांची स्वच्छता करण्यात येते.
पाळीव प्राण्यांची विष्ठा न उचलल्यास दंडात्मक कारवाई
महापालिका स्वच्छता आणि आरोग्य उपविधीची अंमलबजावणी करण्यात येणार असून पाळीव प्राण्याकडून पदपथ, उद्याने, रस्ते या सार्वजनिक ठिकाणी विष्ठा करून परिसरात घाण केल्यास संबंधितावर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करून प्रतिबंध करण्यात येणार आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्म विकसीत
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाच्या साफसफाई, देखभाल दुरुस्ती व सर्व समावेश देखभाल, पाणी पुरवठा व अटेण्डची उपलब्दता या बाबत परिसरातील नागरिकांकडून अभिप्राय नोंदवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार असून त्यामार्फत नागरिकांचे येणारे रिपोर्ट वरिष्ठ अधिकऱ्याकडे तात्काळ उपलब्द होतील.