HomeमहामुंबईठाणेThane : पोलिसांच्या ‘भरोसा’ सेलवर महिलांना प्रचंड भरोसा

Thane : पोलिसांच्या ‘भरोसा’ सेलवर महिलांना प्रचंड भरोसा

Subscribe

६३ कुटुंबांचे संसार पुन्हा जोडले

ठाणे । ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा कक्ष गुन्हे शाखा येथे ७०२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामध्ये विशेष म्हणजे ६३ कुटुंबांचे वाद मिटवून त्यांचे संसार पुन्हा जोडण्याचे कार्य पोलिसांच्या भरोसा सेलने केले. यामुळे महिला वर्गाचा ठाण्यातील पोलिसांच्या भरोसा सेलवर प्रचंड विश्वास बसला आहे. या कार्यालयामध्ये राष्ट्रपती पदक प्राप्त, पोलीस उपनिरीक्षक सुरेश मोरे यांच्या कामाचा अनुभव पाहता तसेच कार्यालयातील सर्वच कर्मचार्‍यांचा योग्य प्रकारे काम करण्याच्या उद्देश पाहता, या भरोसा सेलमध्ये तक्रार घेऊन येणार्‍या महिला वर्गाला योग्य न्याय देण्याचा मार्ग मिळत आहे. यामुळे तक्रारींचे निवारण योग्य प्रमाणे होत आहे.

भरोसा कक्षा गुन्हे शाखा ठाणे (महिला तक्रार निवारण कक्ष ) या ठिकाणी महिला आणि पुरुष अर्जदारांनी एकमेकांविरोधात कौटुंबिक, शारीरिक, मानसिक त्रास दिल्याबाबत १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षात ७०२ तक्रारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अर्जदार आणि गैरअर्जदार यांच्यामध्ये या कक्षाच्या वतीने समुपदेशन करून आतापर्यंत ६३ संसार जोडून कौटुंबिक समझोता केला. तसेच वर्षाअखेरीस १७३ अर्ज कारवाई करीता पोलीस आयुक्तालयातील संबंधित पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर राहत असलेले अर्जदार आणि गैर अर्जदार यांचे ८० अर्ज ते राहत असलेल्या ठिकाणी वर्ग करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयातील शाळा, कॉलेज याना पोलीस स्टेशन स्थरावर नेमण्यात आलेले दामिनी पथक, पोलीस काका, पोलीस दिदी, पोलीस हद्दीतील बिट मार्शल, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार भेटीगाठी देत असून जनजागृती करतात. तसेच मागील वर्षभरात मनोधेर्य योजने अंतर्गत एकूण ५०७ पीडित बालक आणि महिलांना अर्थसहाय्य सहकार्य केले आहे.

या कामगिरीत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्य्क पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुरेश मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक वासंती शिंदे, शुभदा पार्टे, पोलीस हवालदार पल्लवी राऊत, संगीत महाले, विद्या फापाळे, कुंती चोले, सुनीता बागुल, दीपाली जाधव, प्रियांका पाटील, पूजा जगताप यांनी विशेष कामगिरी केली.