उल्हासनगर । उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी मालमत्ताकर वसुलीसाठी सुरू केलेल्या धडाकेबाज मोहिमेमुळे मालमत्ता थकबाकी धारकांचे धाबे दणाणले आहेत. मालमत्ता करात सूटविषयी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार कुमार आयलानी यांनी मनपा आयुक्त यांना अभय योजना लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अखेर २४ फेब्रुवारी रोजी अभय योजना घोषित करण्यात आली आहे. ही योजना १८ मार्चपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त अजय साबळे यांनी दिली.
सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. उल्हासनगरात एक लाख ८५ हजार मालमत्ताधारक असताना कोट्यवधी रुपयांची थकबाकी मालमत्ता धारकांवर आहे. त्यामुळे महापालिकेसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच मालमत्ता कर विभागात १८ कर्मचार्यांची बदली करुन कर वसुलीला गती देण्याचा प्रयत्न केला. कर वसुलीची मोहिम जोरात सुरू असल्याने थकबाकीदारांमध्ये एकच खळबळ उडाली. या पूर्वी महापालिकेने एक रकमी कराची वसुली व्हावी म्हणून वेळोवेळी अभय योजना लागू करण्यात आलेली होती. दरवर्षी कराची रक्कम वाढत जात असल्याने करदाते कर भरण्यास विलंब करतात. म्हणून अभय योजनेच्या माध्यमातून कर वसूल व्हावा यासाठी पुन्हा अभय योजना सुरु करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. ही योजना २४ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेचा मालमत्ताकरधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.